रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील चिंचवाडजवळील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 13:16 IST2024-10-03T13:16:14+5:302024-10-03T13:16:31+5:30
अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल

रेल्वेचा अपघात घडविण्याचा प्रयत्न, कोल्हापुरातील चिंचवाडजवळील घटना
गांधीनगर : रुकडी ते वळीवडे रेल्वेस्थानकाच्या चिंचवाड हद्दीत रेल्वे रुळावर साखळीच्या साह्याने लॉक केलेली लोखंडी ए.आर.सी. (चावी) ट्रॅकच्या पटरीवर ठेवून रेल्वेचा अपघात करण्याच्या उद्देशाने अज्ञाताने कटकारस्थान रचल्याचे रविवारी (दि.२९ सप्टेंबर) दुपारच्या सुमारास उघडकीस आले.
याबाबतची फिर्याद रेल्वे पथ अभियंता हनुमंतअप्पा फकीरअप्पा बजंत्री मूळ रा. मल्लापूर, पो. लखमापूर जिल्हा बागलकोट, सध्या रा. स्टेशन रोड हातकणंगले यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी दुपारी मध्य रेल्वेची मालगाडी ही मिरजहून कोल्हापूरकडे येत असताना के.एम. ३८/१, ३८/२ च्या दरम्यान चिंचवाड रेल्वे फाटक क्रमांक २४ च्या पूर्वेला रेल्वे रुळाला लॉक केलेली लोखंडी ए.आर.सी. चावीवरून मालगाडी डब्याचे चाक गेल्याने लॉक तुटले. त्यामुळे मोठा आवाज झाला.
रेल्वे गनमॅन (चालक) यांनी तत्काळ रेल्वे थांबवून पाहणी केली असता ही बाब यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ वरिष्ठांना याबाबत कळवले. अज्ञाताविरोधात गांधीनगर पोलिस ठाण्यात घातपातीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक विनय झुंजुर्के करीत आहेत.