Kolhapur: अंबाबाई-त्र्यंबोली सखींची उद्या भेट, दहा वर्षाची स्वरा करणार कोहळा भेदन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 17:55 IST2025-09-26T17:54:37+5:302025-09-26T17:55:03+5:30
त्र्यंबोली यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात

Kolhapur: अंबाबाई-त्र्यंबोली सखींची उद्या भेट, दहा वर्षाची स्वरा करणार कोहळा भेदन
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई व त्र्यंबोली देवी या प्रिय सखींची उद्या शनिवारी सह्दय भेट होणार आहे. ललिता पंचमीच्या याेगावर त्र्यंबोली यात्रा होत असून यात गुरव घराण्यातील स्वरा जयदीप गुरव ही दहा वर्षाची चिमुरडी राक्षसरूपी कोहळा भेदनाचा विधी करणार आहे. ती विद्यापीठ शाळेत चौथीच्या वर्गात शिकत आहे. या यात्रेसाठी अंबाबाई मंदिर ते त्र्यंबोली मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क केले जात आहे. पालखी मार्गावर अंबाबाईच्या स्वागताच्या कमानी उभारण्यात आल्या आहेत.
शारदीय नवरात्रौत्सवात ललिता पंचमीला करवीर निवासिनी श्री अंबाबाई आपली प्रिय सखी देवी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते. तिथे छत्रपतींच्या हस्ते गुरव घराण्यातील कुमारिकेचे पूजन व तिच्या हस्ते कोहळा भेदन्याचा विधी होतो. या यात्रेसाठी सकाळी १० वाजता अंबाबाईची उत्सवमूर्ती असलेली पालखी शाही लव्याजम्यानिशी त्र्यंबोलीसाठी निघते. भवानी मंडप, बिंदू चौक, आझाद चौक, उमा टॉकीज चौक, बागल चौक, टाकाळा ते त्र्यंबोली मंदिर असा पालखी मिरवणुकीचा मार्ग असतो. याच मार्गाने सायंकाळी पालखी मंदिरात परत येते.
नवरात्रौत्सव सुरू होण्यापूर्वीच या मार्गावरील रस्त्यांचे पॅचवर्क करण्याच्या, खणीची स्वच्छता करण्याच्या, पालखी मार्गात येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेतर्फे बुधवारपासून या कामाला सुरुवात करण्यात आली. कोटीतीर्थ, टाकाळा येथील खणीची स्वच्छता केली जात आहे.
इच्छुकांच्या कमानी..
त्र्यंबोली यात्रेच्या निमित्ताने महापालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या संभाव्य उमेदवारांच्या मात्र स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. उमेदवारांनी आपल्या छायाचित्रासह उभारलेल्या या कमानीत पालखी व भाविकांचे स्वागत केले आहे, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनीही आपल्या ब्रँडिंगची ही संधी सोडलेली नाही.
अवजड वाहनांना प्रवेश बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणार
त्र्यंबोली देवीच्या यात्रेसाठी शनिवारी (दि. २७) त्र्यंबोली मंदिरकडे जाणाऱ्या सर्व मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. तसेच पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवण्यात आल्याची माहिती शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिली.
शनिवारी सकाळपासूनच टेंबलाई उड्डाणपुलापासून पुढे उचगावच्या दिशेने जाणारी खासगी वाहतूक बंद केली जाणार आहे. उचगाव, टेंबलाईवाडीकडून शहरात येणारी वाहने शाहू नाका, सायबरमार्गे शहरात येतील. ताराराणी चौकातून उड्डाणपूलमार्गे महामार्गाकडे जाणारी वाहने शिरोली नाक्याकडून महामार्गावर वळविण्यात आली आहेत.
टाकाळा चौकातून पुढे कोयास्को चौकाकडे जाणारी वाहतूक वि. स. खांडेकर मार्गावरून राजारामपुरीतून सायबरच्या दिशेने वळविण्यात आली आहे. अंबाबाईची पालखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी जाताना गरजेनुसार पालखी मार्गावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी दिली.