Navratri २०२५: चौथ्या माळेला कोल्हापुरातील अंबाबाईची मातंगी माता रूपात पूजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 15:45 IST2025-09-25T15:44:17+5:302025-09-25T15:45:09+5:30
ही नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला गुरुवारी (दि. २५) कोल्हापुरातील श्री करवीर निवासिनी अंबाबाईची श्री मातंगी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ही देवी लघुश्यामा, उच्छिष्टमातंगी, राजमातंगी, सुमुखी, संमोहिनी, चंडमातंगी, वश्यमातंगी, कर्णमातंगी, तैलमातंगी या नावाने ओळखली जाते.
भगवान शिव हे मतंग असून, त्यांनी त्रिपुरीची उपासना केली असता, त्यांच्या नेत्रतेजातून या देवीची उत्पत्ती झाली, किंवा (कल्पभेदाने) मतंगॠषींच्या कन्येच्या रूपात हिने अवतार घेतल्याने हिला ‘मातंगी’ म्हणतात. ही नववी महाविद्या असून, मतंग हे तिचे भैरव आहेत. ही श्रीकुलातील देवता उत्तराम्नायपीठस्था आहे. हिच्या उपासनेने वाचासिद्धी, कवित्वलाभ, वेद-वेदांत, ज्योतिष, संगीतविद्या आदी प्राप्ती होते व भक्तांच्या शत्रूचा नाश होतो, ही सर्वकामनासिद्ध करणारी देवता आहे. ही पूजा श्रीपूजक पुरुषोत्तम ठाणेकर, उमेश उदगावकर, संतोष जोशी व अवधूत गोरंबेकर यांनी बांधली.
स्वरूप
श्यामवर्णी, तीन नेत्र असलेली, माथ्यावर चंद्र धारण केलेली, चार हातांमध्ये भक्तांच्या शत्रूनाशासाठी अंकुश आणि तलवार, पाश आणि ढाल धारण केलेल्या रत्नालंकारांनी युक्त अशा दयावंत, सर्वसिद्धी देणारी ही मातंगीदेवी आहे.