Navratri २०२५: अंबाबाईच्या गर्दीत 'एआय' डिटेक्शन; ७ आरोपी शोधले, चौघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 18:20 IST2025-09-26T18:18:12+5:302025-09-26T18:20:44+5:30
मुखदर्शनाच्या रांगा, पालखी सोहळा या ठिकाणच्या घडामोडी संवेदनशील

Navratri २०२५: अंबाबाईच्या गर्दीत 'एआय' डिटेक्शन; ७ आरोपी शोधले, चौघांना पकडले
कोल्हापूर : नवरात्रौत्सवात श्री अंबाबाई मंदिरातील मुखदर्शनाच्या रांगा आणि रात्रीचा पालखी सोहळा या दोन ठिकाणच्या घडामोडी संवेदनशील ठरत असल्याचे डिटेक्शन एआयने केले आहे. या दोन्ही ठिकाणी भाविकांची सर्वाधिक गर्दी होते व येथेच चोरांचाही वावर असल्याचे दिसून आले आहे. अंबाबाई मंदिरातील सर्व सुरक्षा यंत्रणा व भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन ‘एआय’कडून केले जात आहे. गेल्या चार दिवसांत ७ आरोपी मंदिर परिसरात आढळले. त्यापैकी चार जणांना पकडले.
‘एआय’चे आपत्ती व्यवस्थापन विभागांतर्गत आयआयटी मंडी व वेलोस ग्रुपकडून कंट्रोलिंग केले जात आहे. अंबाबाई मंदिरातील १२२ कॅमेऱ्यांना ते जोडले गेले आहे. गणपती चौकातील मुखदर्शन रांग व गरुड मंडपातील मुखदर्शन रांगांवर तसेच रात्री साडेनऊ ते ११ वाजेपर्यंत पालखी सोहळ्यावेळी देखील हीट मॅप अलर्ट आला आहे.
याचा ॲक्सेस आपत्ती व्यवस्थापन, पोलिस मुख्यालय, वाहतूक शाखेला दिला आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व हर्षवर्धन साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली २० जणांची टीम कार्यरत असून, शेतकरी बझार येथील कक्षात १०, पोलिस मुख्यालय ६, वेलोस कार्यालयातून ४ जण कंट्रोलिंग करत आहेत.
शहरातील वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे
शहरातील १५७ कॅमेऱ्यांना एआय तंत्रज्ञानाने जोडले असून, त्यात वाहतुकीच्या कोंडीची ठिकाणे शोधली आहेत. सीपीआर ते अंबाबाई मंदिर, रंकाळा टॉवर ते गंगावेश, महाद्वार ते पापाची तिकटी, बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जास्त कोंडी आढळली आहे.
एआय करते काय?
- आरोपीसह भाविकांच्या चेहऱ्याचे फोटो.
- तासनिहाय अंबाबाई मंदिरातील भाविक संख्या.
- अंबाबाई मंदिरातील गर्दीची क्षमता संपली की अलर्ट.
- हीट मॅप सिस्टीम-गर्दीची ठिकाणे शोधून अलर्ट.
२३१ पैकी ७ आरोपींचा शोध
पोलिस प्रशासनाकडील माहितीनुसार, त्यांनी देशभरातील २३१ आरोपींची नावे व फोटो ‘एआय’कडे फेस रिकग्नेशनसाठी दिले आहेत. त्यापैकी गेल्या चार दिवसांत ७ आरोपी मंदिर परिसरात आढळले. त्यापैकी चार जणांना पकडले आहे.
आजारी पत्नीचा शोध
गुरुवारी दुपारी परस्थ वयोवृद्ध दाम्पत्य अंबाबाई दर्शनासाठी आले होते. त्यातील महिलेला फिटचा त्रास होता. दोन तास शाेधल्यानंतरही पतीला सापडल्या नाहीत. अखेर पतीने आपत्ती नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली. पत्नीचा फोटो ‘एआय’मध्ये फिड केल्यानंतर त्या विद्यापीठ गेट आवारात असल्याचे दाखवले.