‘अलमट्टी’ उंचीविरोधात रविवारी सर्वपक्षीय मेळावा, कर्नाटक सरकारचा प्रयत्न हाणून पाडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 13:27 IST2025-05-07T13:26:44+5:302025-05-07T13:27:15+5:30

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून, त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रविवारी (दि. ११) ...

All party rally on Sunday against Almatti dam height, will thwart Karnataka government’s efforts | ‘अलमट्टी’ उंचीविरोधात रविवारी सर्वपक्षीय मेळावा, कर्नाटक सरकारचा प्रयत्न हाणून पाडणार

‘अलमट्टी’ उंचीविरोधात रविवारी सर्वपक्षीय मेळावा, कर्नाटक सरकारचा प्रयत्न हाणून पाडणार

कोल्हापूर : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून, त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी रविवारी (दि. ११) दुपारी एक वाजता सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामध्ये खासदार, आमदारांसह सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

विक्रांत पाटील म्हणाले, धरणाच्या उंचीबाबत नेमलेल्या लवादानेही उंची वाढवण्यास हिरवा कंदील दाखवला आहे, त्याचा अहवाल प्रसिद्ध करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. कर्नाटक उंची वाढवण्यावर ठाम असून, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्याने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने हे काम थांबले आहे. महाराष्ट्र शासनाचे म्हणणे लवादाने फेटाळून लावले आहे.

कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवू देणार नाही, त्यासाठी संघर्षाची भूमिका घेतली जाईल. आंदोलनाची आगामी भूमिका ठरवण्यासाठी रविवारी सर्वपक्षीय मेळाव्याचे आयोजन केल्याचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर यांनी सांगितले.

मेळाव्याला खासदार शाहू छत्रपती, धैर्यशील माने, धनंजय महाडिक यांच्यासह बाधित तालुक्यांतील आमदार, कोल्हापूर चेंबर ऑफ काॅमर्स, ग्रीन मर्चंट असोसिएशन, कोल्हापूर धान्य व्यापारी संघटना, शेतकरी संघटना, सहकारी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर यांनी सांगितले. यावेळी, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे, चंद्रकांत पाटील, सखाराम चव्हाण, मारुती पाटील उपस्थित होते.

तर ३०० टीएमसी पाणीसाठा

अलमट्टी धरणाची सध्या १२५ टीएमसी पाणी साठा क्षमता आहे. धरणाची उंची ५ मीटरने वाढवल्यानंतर ही क्षमता ३०० टीएमसीपर्यंत जाणार असल्याचे विक्रांत पाटील यांनी सांगितले.

‘आंध्र’, ‘तेलंगणा’ला दुष्काळीची भीती

अलमट्टी धरणाची उंची वाढल्याने पावसाळ्यात पाण्याची तुंबी वाढून काेल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराची भीती आहे. तर पावसाळ्यातील त्यांच्या वाट्याचे पाणी धरणातच राहिल्याने दुष्काळीची भीती आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांना आहे.

Web Title: All party rally on Sunday against Almatti dam height, will thwart Karnataka government’s efforts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.