'एआय'ची नजर राहणार, अपघातांचा धोका कमी होणार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' महामार्गांचा समावेश, आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय...वाचा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:24 IST2026-01-30T12:23:21+5:302026-01-30T12:24:20+5:30
८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार

'एआय'ची नजर राहणार, अपघातांचा धोका कमी होणार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' महामार्गांचा समावेश, आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय...वाचा
कोल्हापूर : वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी राज्याच्या गृह विभागाने विविध महामार्गांवर ‘एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली’ (आयटीएमएस) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. ३६ जिल्ह्यांमधील २१ हजार ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवरील ८६९ ब्लॅकस्पॉटवर एआयच्या मदतीने लक्ष ठेवले जाणार आहे. यात जिल्ह्यातील दोन महामार्गांचा समावेश आहे. त्यामुळे अपघात कमी होऊन प्रवास सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
‘एआय’ आधारित आयटीएमएस प्रणाली आहे तरी काय?
आयटीएमएस म्हणजेच एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सध्या मुंबई-पुणे महामार्गावर ही यंत्रणा कार्यरत आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारी वाहने रस्त्यालगत लावलेल्या कॅमेऱ्यांमध्ये कैद होतात. संबंधित वाहनाच्या मालकाला दंडाचा मेसेज जातो. पुढील टोल नाक्यावर वाहतूक पोलिसांकडून दंडाची वसुली केली जाते.
सीसीटीव्ही, सेन्सर्स वाहनचालकांना इशारा देणार
एआय तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे आणि सेन्सर्स आयटीएमएस प्रणालीला संदेश पाठवतात. त्यानुसार ही प्रणाली संबंधित कारच्या मालकास सूचना आणि इशारा देणारे मेसेज पाठवते. यामुळे अपघातांचा धोका टाळता येतो.
१७ प्रकारचे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना ई-चलान
वेग मर्यादेचे उल्लंघन, लेनचे नियम मोडणे, उलट्या दिशेने प्रवास करणे, सीटबेल्ट नसणे, वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे अशा १७ प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन कॅमेऱ्यांकडून पकडले जाते. वाहनमालकांना त्याचवेळी दंडाचा मेसेज पाठवून त्याची वसुलीही केली जाते.
जिल्ह्यातील या महामार्गांचा समावेश
जिल्ह्यातून जाणाऱ्या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली बसवली जाणार आहे. यात पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या महामार्गांचा समावेश आहे. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर कॅमेरे आणि सेन्सर्स बसवले जाणार आहेत. यात ब्लॅक स्पॉट आणि रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणांचा समावेश आहे.
अपघातांचा धोका कमी होणार
या प्रणालीमुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहील. धोकादायक पद्धतीने वाहने चालवणाऱ्यांना दंडाचा भुर्दंड बसेल. ठिकठिकाणी ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे अपघातांचा धोका कमी होऊन प्रवास सुरक्षित होईल, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली.
जिल्ह्यातून जाणारे पुणे-बंगळुरू आणि रत्नागिरी-नागपूर या दोन महामार्गांवर आयटीएमएस प्रणाली कार्यान्वित होईल. यामुळे रस्ता सुरक्षेत भर पडेल. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन केल्यास दंड भरण्याची वेळ येणार नाही. - सत्यराज घुले - महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक