Chanda Tigress: चंदा वाघिणीने डरकाळी फोडली, ताडोबातून ८५० किलोमीटरचा प्रवास करुन सह्याद्रीत पोहचली
By संदीप आडनाईक | Updated: November 14, 2025 11:51 IST2025-11-14T11:44:22+5:302025-11-14T11:51:43+5:30
ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतून आठ वाघ (तीन नर आणि पाच मादी) 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त टप्प्याटप्प्याने आणले जाणार

Chanda Tigress: चंदा वाघिणीने डरकाळी फोडली, ताडोबातून ८५० किलोमीटरचा प्रवास करुन सह्याद्रीत पोहचली
संदीप आडनाईक
कोल्हापूर : पश्चिम घाटात वाघांची संख्या वाढविण्याच्या केंद्र सरकारच्या 'ऑपरेशन तारा' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला प्रारंभ झाला आहे. ताडोबा-अंधारी प्रकल्पातील 'चंदा' या वाघिणीला घेऊन वन विभागाने 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'च्या दिशेने बुधवारी सायंकाळी प्रस्थान केले. सुमारे ८५० किलोमीटरचा प्रवास करून हे पथक गुरुवारी मध्यरात्री 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त पोहोचत आहे.
पर्यावरण मंत्रालयाने दोन महिन्यांपूर्वी स्थलांतरास परवानगी दिल्यानंतर राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पांतून आठ वाघ (तीन नर आणि पाच मादी) 'सह्याद्री व्याघ्र प्रकल्पा'त टप्प्याटप्प्याने आणले जाणार आहेत. ताडोबाच्या बफर क्षेत्रातील अलिझांझा पर्यटन क्षेत्रातून 'चंदा' नावाच्या वाघिणीला बुधवारी रात्री उशिरा पकडले. तिच्या गळ्यात 'रेडिओ काॅलर' बसवला आहे.
रस्तेमार्गाने वन्यजीव रुग्णवाहिकेमधून सायंकाळी या वाघिणीचा सह्याद्रीच्या दिशेने प्रवास सुरू झाला. दुपारी १२ वाजता नांदेड येथे थोडी विश्रांती घेतली. गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री हा ताफा 'सह्याद्री'त पोहोचेल. डेहराडून येथील वन्यजीव संस्थेतील तज्ज्ञ आणि ताडोबा-सह्याद्रीचे अधिकारी सोबत आहेत. सध्या सह्याद्रीत तीन नर वाघ आहेत. त्यामुळे सह्याद्रीत येणार असल्यामुळे चंदाचा सांकेतिक क्रमांक 'एसटीआर ०४' असा आहे.
चंदापाठोपाठ येणार चांदणी...
गेल्या काही वर्षांत सह्याद्रीतील वाघांची संख्या कमी झाली होती; अधिवास तुटल्याने आणि प्रजननाच्या संधी मर्यादित राहिल्याने हा प्रकल्प कार्यान्वित केला. वय, प्रकृती आणि नव्या प्रदेशाशी जुळवून घेण्याची क्षमता या आधारे 'चंदा' आणि 'चांदणी' या तरुण आणि अनुभवी अशा दोन वाघिणींची 'सह्याद्री'त आणण्यासाठी निवड केली आहे. पाठोपाठ चांदणीलाही आणण्यात येणार आहे.
चंदा आहे गर्भवती
ताडोबातील गोरेवाड्यातील रेस्क्यू सेंटरमध्ये असलेला प्रसिद्ध वाघ 'छोट्या मटक्या'ची चंदा ही मुलगी आहे. तिची आई 'जर्नी' ही 'वाघडोह' या ताहोबातील सगळ्यात मोठ्या वाघाची मुलगी आहे. म्हणजे 'वाघडोह' हा चंदाचा आजोबा आहे. आता तीन वर्षांची असलेली चंदा गर्भवती आहे. ताडोबातील 'बाली' या नर वाघासोबतचे मीलन जून महिन्यातच झाले होते.
चंदाला पुढचे काही दिवस विलगवासाच्या पिंजऱ्यात ठेवण्यात येईल. त्यानंतर तिला व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात सोडून 'रेडिओ काॅलर'च्या मदतीने हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. -तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प.