पन्हाळ्यावरील बंगल्यात अभिनेत्री संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य, पिंजरा, दो आंखे बारह हाथच्या चित्रीकरणाच्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:19 IST2025-10-05T17:16:54+5:302025-10-05T17:19:09+5:30
कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे जॉकी खाडे यांच्या शेतात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. १९५९ मधील नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रीत केलेले 'अरे जा रे हट नटखट' या गाण्याचा काही भाग पन्हाळ्यावरील या बंगल्यात चित्रीत झाला होता...

पन्हाळ्यावरील बंगल्यात अभिनेत्री संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य, पिंजरा, दो आंखे बारह हाथच्या चित्रीकरणाच्या आठवणी
संदीप आडनाईक -
कोल्हापूर : अभिनेत्री संध्या यांच्या निधनाने कोल्हापुरात त्यांच्या वास्तव्याच्या आणि पिंजरा, दो आंखे बारह हाथ यासारख्या गाजलेल्या चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या आठवणींना उजाळा मिळाला. पन्हाळ्यावरील बंगल्यात व्ही. शांताराम यांच्यासह संध्या यांचे अनेक वर्षे वास्तव्य होते. कसबा बावडा येथील गोळीबार मैदान येथे जॉकी खाडे यांच्या शेतात दो आंखे बारह हाथ चित्रपटाचे शूटिंग झाले होते. १९५९ मधील नवरंग चित्रपटातील संध्या यांच्यावर चित्रीत केलेले 'अरे जा रे हट नटखट' या गाण्याचा काही भाग पन्हाळ्यावरील या बंगल्यात चित्रीत झाला होता.
कोल्हापुरातील पोस्टर आर्टिस्ट कलायोगी जी. कांबळे यांनी झनक झनक पायल बाजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चित्रपटगृहाच्या समोर फिरत्या ड्रमवरील संध्याचा नृत्याविष्कार, स्त्री चित्रपटातील घोड्यावरून पळवून नेतानाचे संध्या यांचे काळ्या बुरख्यातून दिसणारे पारदर्शक सौंदर्य, दो आंखे बारह हाथ चित्रपटांतील संध्या यांचे हातात वाद्य घेतलेले ३५० फुटाचे त्यांचे भव्य पोस्टर मुंबईच्या ऑपेरा हाउसवर झळकलेले होते. काेल्हापुरातील स्टुडिओत हे पोस्टर तयार केले तेव्हा स्वत: संध्या ते पाहून आश्चर्यचकित झाल्या होत्या, अशी आठवण त्यांचे चिरंजीव अशोक कांबळे यांनी सांगितली.
खेबूडकरांना पुरणपोळी घातली खायला -
पिंजरा चित्रपटाच्या गाण्यांसाठी कवी जगदीश खेबूडकर जेव्हा मुंबईतील शांताराम यांच्या रामविलास बंगल्यात पाच वर्षे मुक्कामी होते, तेव्हा दसरा, अक्षय तृतीयेला संध्या स्वत:च्या हाताने पुरणपोळी बनवून त्यांना खायला घालत, अशी आठवण खेबूडकरांच्या कन्या अंगाई यांनी सांगितली. पिंजरा चित्रपटात नाच्याची भूमिका करणारे मास्टर आबू यांनी संध्या यांच्यासोबतच्या अनेक आठवणी ऐकल्याचे त्यांचे चिरंजीव अस्लम वंटमुरीकर यांनी सांगितले. नाच्याच्या भूमिकेसाठी मेकअप केल्यावर ते आपल्यापेक्षा अधिक गोरे आणि देखणे दिसत, असे कौतुक संध्या यांनी केल्याची आठवण अस्लम यांनी ऐकवली.