वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

By Admin | Updated: December 17, 2014 22:53 IST2014-12-17T22:29:11+5:302014-12-17T22:53:04+5:30

साताऱ्यातील घटना : पाच गंभीर जखमी

Action between two groups in Dancing Harvest | वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

वरातीत नाचण्यावरून दोन गटांत हाणामारी

सातारा : वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीतून दोन गटांत कुऱ्हाड, काठी आणि दगडाने तुंबळ मारामारी झाली. या घटनेत पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. ही घटना आज, बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साताऱ्यातील नामदेववाडीत घडली.
सेठिबा भानादास खवले (वय ६५), लक्ष्मण सेठिबा खवले (४५), किसन सेठिबा खवले (४०), विठाबाई कल्पना खवले (५५), अनिल कल्याण खवले (२२, सर्व रा. नामदेववाडी झोपडपट्टी, बुधवार नाक्याजवळ, सातारा) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आज दुपारी खवले कुटुंबातील एकाचे लग्न होते. या लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून दोन युवकांमध्ये वादावादी झाली होती. दरम्यान, सायंकाळी हा वाद मिटविण्यासाठी दोन्ही गटांचे प्रयत्न सुरू होते. त्यावेळी शाब्दिक बाचाबाचीतून दोन्ही गट एकमेकांना भिडले. कुऱ्हाड, काठी, दगडांनी एकमेकांवर वर्षाव सुरू झाला. यामध्ये पाचजण गंभीर जखमी झाले. सुमारे पंधरा मिनिटे ही धुमश्चक्री सुरू होती. नामदेववाडीतीलच काही युवकांनी दोन्ही गट वेगवेगळे केले. त्यामुळे वाद मिटला. त्यानंतर जखमींना तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. ओठ, डोके, पाठ, आदी ठिकाणी या पाचजणांना गंभीर जखमा झाल्या आहेत. हा प्रकार घडल्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)


नातेवाइकांचा आक्रोश..
नामदेववाडीत मारामारी झाल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या संख्येने जमाव जमला. त्यामुळे शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ रुग्णालयासमोर बंदोबस्त तैनात केला. जखमींचे नातेवाईक रुग्णालयासमोर आक्रोश करत होते. पाचपैकी दोनजणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्या दोघांना खासगी रुग्णालयात हलविण्याचे नातेवाइकांचे रात्री उशिरा प्रयत्न सुरू होते.

Web Title: Action between two groups in Dancing Harvest