Kolhapur: धार्मिक गाणी शिकविण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार, भादोलेच्या आरोपीस २० वर्षे सक्त कारावास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 12:21 IST2026-01-13T12:20:20+5:302026-01-13T12:21:33+5:30
पालकांचा विश्वासघात केला

Kolhapur: धार्मिक गाणी शिकविण्याच्या बहाण्याने बालिकेवर अत्याचार, भादोलेच्या आरोपीस २० वर्षे सक्त कारावास
कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील भादोले येथे राहणारा राजाराम अशोक सुतार (वय ५२) याने धार्मिक गाणी शिकविण्याच्या बहाण्याने दहा वर्षीय बालिकेवर घरी बोलवून अत्याचार केल्याचे न्यायालयात सिद्ध झाले. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी सुतार याला दोषी ठरवून २० वर्षे सक्तमजुरी, एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. नोव्हेंबर २०१७ मध्ये घडलेल्या गुन्ह्याची अंतिम सुनावणी सोमवारी (दि. १२) झाली.
सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम सुतार हा गावातील लहान मुलींना धार्मिक गाणी शिकवत होता. त्याच्याकडे आलेल्या एका दहा वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास मारहाण करण्याची धमकी दिली. त्या घटनेनंतर पीडित मुलीने त्याच्या घरी जाणे बंद केले. दीड महिन्याने तो पीडित मुलीच्या घरी जाऊन पुन्हा गाणी शिकण्यासाठी येण्याचा आग्रह करीत होता. त्यावेळी घाबरलेल्या मुलीने अत्याचाराची माहिती आईला सांगितली. आईच्या फिर्यादीवरून पेठवडगाव पोलिसांनी सुतार याच्यावर गुन्हा दाखल केला होता.
तत्कालीन पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी तपास करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. ॲड. पाटोळे यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. पाटोळे यांचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुरावे ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी आरोपीला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
पालकांचा विश्वासघात केला
धार्मिक कार्यात अग्रभागी असलेला राजाराम सुतार महाराज म्हणून परिसरात परिचित होता. त्याच्यावर विश्वास ठेवून अनेक पालक लहान मुलांना त्याच्याकडे पाठवत होते. मात्र, त्याने पालकांचा विश्वासघात करून बालिकेसोबत कुकर्म केले होते.