Kolhapur: अपहार कबूल करायला लावण्यासाठी लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:42 PM2024-04-18T15:42:17+5:302024-04-18T15:43:37+5:30

आठ जणांना अटक : धाक दाखवण्यासाठी कोयत्याचा वापर

Accountant of Kolhapur Zilla Parishad was kidnapped and beaten to make him confess embezzlement | Kolhapur: अपहार कबूल करायला लावण्यासाठी लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण

Kolhapur: अपहार कबूल करायला लावण्यासाठी लेखाधिकाऱ्याचे अपहरण करून मारहाण

कोल्हापूर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारचे लेखाधिकारी दीपक बाळासाहेब माने (वय: ४४, रा. रॉयल इनफिल्ड अपार्टमेंट, नागाळा पार्क, कोल्हापूर) यांचे स्वयंपाक व मदतनीस यांच्या मानधन निधीतील २३ लाखांचा अपहार तूच केल्याचे कबूल कर, असे म्हणत बुधवारी आठ जणांनी अपहरण करून त्यांना कोयत्याच्या मुठीने मारहाण केली. टेंबलाई मंदिर परिसरातील मणेरमळा मैदानात ही घटना घडली.

याप्रकरणी इंद्रजित मारुती साठे (३८, रा. विनोद चौगुलेनगर, कळंबा, ता. करवीर), संग्राम दिनकर जाधव ( ४२, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर), उत्तम आनंदा भोसले ( ३०, रा. पाटपन्हाळा, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर), प्रकाश मेहपती मिसाळ (३२, रा. मिसाळवाडी, ता. राधानगरी), संदीप मधुकर ठमके ( ४०, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर), महादेव कृष्णा मेथे (४६, रा. रामानंदनगर, कोल्हापूर), मंगेश तुकाराम जाधव ( ४२, रा. कुंभार गल्ली, पापाची तिकटी, कोल्हापूर), प्रसाद संजय आमले ( वय : ३१, रा. बागलचौक, कोल्हापूर) यांना राजाराम पोलिस ठाण्यातील पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून कोयता आणि तवेरा कार जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आरोपीतील संदीप ठमके हे प्राथमिक शिक्षण विभागात कनिष्ठ लिपिक आहे. इंद्रजित साठे यांच्या पत्नी डाटा ऑपरेटर म्हणून आहेत.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी दीपक माने आणि संशयित आरोपी इंद्रजित साठे यांच्या पत्नी आणि संदीप हे प्राथमिक शिक्षण विभागातच काम करतात. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दरम्यान, बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता अधिकारी माने हे कमला कॉलेज येथे लोकसभा निवडणुकीच्या कामावर होते. त्यावेळी संशयित आरोपी इंद्रजित आणि त्यांच्या सात साथीदारांनी माने यांना बाहेर बोलावून घेतले. मानधन निधी वाटप अपहारासंंबंधी चर्चा करायची आहे, असे त्यांना सांगितले.

चर्चा करत असताना माने यांना आरोपींनी बळजबरीने उचलून आपल्याकडील तवेरा कारमध्ये बसवून घेऊन टेंबलाई मंदिर परिसरात घेऊन गेले. सर्व आरोपींनी संगनमत करून माने यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. वाईट भाषेत शिवीगाळ केली. स्वयंपाक मदतनीस यांचे मानधन निधीची २३ लाख रकमेचा अपहार तूच केलेला आहे, असे कबूल कर आणि ही रक्कम तूच भर व वरून आम्हास १० लाख रुपये दे, नाही तर तुझ्यावर विनयभंगाची केस करतो, असे असे म्हणून मोबाईल शूटिंग करून मारहाण केली. यावेळी इंद्रजित साळे यांनी हातातील कोयत्याच्या मुठीने मारहाण केली.

जि. प. तील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

अधिकाऱ्याला अपहरण आणि मारहाण प्रकरणातील जिल्हा परिषदेतील तब्बल २३ लाखांचा अपहार चव्हाट्यावर आला आहे. परिणामी जिल्हा परिषदेतील भ्रष्टाचारालाही यानिमित्ताने वाचा फुटली आहे. हे प्रकरण पोलिसात दाखल होऊ नये म्हणून काहीजण तडजोड करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, फिर्यादी ठाम राहिल्याने याची नोंद रात्री उशिरा पोलिसांत झाली.

दहा लाख कमिशन ?

२३ लाख अपहाराची रक्कम भरून दहा लाख देण्याची मागणी आरोपींनी माने यांच्याकडे केली. दहा लाख रुपये कमिशनसाठी मागणी केल्याची चर्चा होती. परिणामी जिल्हा परिषदेत कमिशनराजही फोफावल्याचे समोर आले आहे.

Web Title: Accountant of Kolhapur Zilla Parishad was kidnapped and beaten to make him confess embezzlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.