Kolhapur News: गर्भपात केला, मृत अर्भके दूधगंगा नदीत फेकली; फॉरेन्सिककडून तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:32 IST2026-03-27T13:32:03+5:302026-03-27T13:32:32+5:30
श्रद्धा हॉस्पिटलच्या दोघी कर्मचारी ताब्यात ; बिद्री, गारगोटीतील चार एजंटही जेरबंद

संग्रहित छाया
कोल्हापूर : बिद्री येथील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. श्रद्धा हॉस्पिटलमधील दोन महिला कर्मचारी आणि बिद्री, गारगोटी परिसरातील चार एजंटना तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी गुरुवारी (दि. २६) चौकशीसाठी ताब्यात घेतले. गुन्ह्यातील त्यांचा सहभाग स्पष्ट होत असल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई होणार आहे. गर्भपात केल्यानंतर मृत अर्भकांची बिद्री येथील दूधगंगा नदीत विल्हेवाट लावल्याची माहिती अटकेतील युवराज पाटील याच्या चौकशीतून समोर आली आहे.
बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान आणि गर्भपात केंद्रात कोल्हापूरसह बेळगाव जिल्ह्यातील अनेक महिलांचे गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांच्या चौकशीतून समोर येत आहे. हॉस्पिटलमधील महिला कर्मचारीच गर्भपाताची औषधे देत होत्या. त्याच मृत अर्भके दूधगंगा नदीत फेकून त्याची विल्हेवाट लावत होत्या, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली. त्यामुळे दोन महिला कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. डॉ. पाटील याच्या कॉल डिटेल्सवरून आणखी काही एजंट आणि डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्याचा मित्र डॉ. उत्तमकुमार सरदेसाई याचाही अद्याप थांगपत्ता लागलेला नाही.
डॉक्टर पाटील याच्याकडे तपासणीसाठी गर्भवतींना पाठवणाऱ्या आठ ते दहा एजंटची नावे निष्पन्न झाली आहेत. यातील बिद्री आणि गारगोटी परिसरातील चौघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री ताब्यात घेतले. त्यांच्यावर अटकेची कारवाई करून शुक्रवारी कागल न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दिली.
फॉरेन्सिकच्या पथकाकडून तपासणी
मृत अर्भकांचे अवशेष मिळविण्यासाठी फॉरेन्सिक विभागाच्या पथकाने बिद्री येथील दूधगंगा नदीत पुरावे शोधले. मात्र, पथकाच्या हाती फारसे काही लागले नाही. बिद्री येथील कचरा डेपो, हॉस्पिटलच्या आसपास असलेली कचरा कोंडाळी, रिकाम्या जागांमध्येही खड्डे काढून मृत अर्भकांची विल्हेवाट लावल्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.