Kolhapur: पोलिस निरीक्षकांकडून युवकाला बेदम मारहाण, आई बेशुद्ध; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 17:57 IST2025-05-19T17:57:17+5:302025-05-19T17:57:32+5:30
शहापूर पोलिस निरीक्षकाचा कारनामा

Kolhapur: पोलिस निरीक्षकांकडून युवकाला बेदम मारहाण, आई बेशुद्ध; व्हिडिओ व्हायरल
इचलकरंजी : प्रेमप्रकरणातून शहापूर पोलिस ठाण्यात हजर झालेल्या युवक, युवतीपैकी युवकाला पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी बेदम मारहाण केली. ते पाहून युवकाची आई बेशुद्ध पडली. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. हा प्रकार शनिवारी (दि.१७) रात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणाचा व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात उलटसुलट चर्चेला ऊत आला होता.
शहापुरातील एक युवक पुण्यात शिक्षणासाठी वास्तव्यास होता. त्यावेळी एका युवतीसोबत त्याचे सूत जुळले. युवक गावी आल्यानंतर ती युवतीही आली. विवाह झाला नसल्याने संबंधित युवकाने तिला घेऊन पोलिसांना कल्पना देण्यासाठी शहापूर पोलिस ठाणे गाठले. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी युवक आणि त्याच्या कुटुंबीयाला दिवसभर बसवून ठेवले. तसेच युवतीच्या नातेवाइकांनाही बोलावून घेतले.
त्यानंतर दिवसभर कोणतीही घडामोड घडली नाही. अचानक रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास साध्या वेशात अचानक निरीक्षक पोलिस ठाण्यात आले. त्यांनी इतर पोलिस कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले. संबंधित युवकाला आत बोलावून घेऊन चांगला प्रसाद दिला. तो बघून युवकाची आई तिथेच बेशुद्ध पडली. त्या महिलेला उचलण्यासाठी एकही महिला कर्मचारी तिथे उपस्थित नव्हती. युवकानेच उचलून पोलिस गाडीमध्ये आईला ठेवले. त्यावेळी तू गाडीत बसू नकोस, असे म्हणून पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी युवकाला बाहेर ओढले आणि पुन्हा मारहाण केली.
युवकाला ओढल्यामुळे त्यावेळी महिला गाडीतून कोसळली. दुसऱ्या महिलेने उचलून तिला गाडीत घातले व शहापूर येथील मलाबादेनगरजवळील खासगी रुग्णालयात नेले. एका नेत्याच्या मध्यस्थीने या प्रकारावर जरी रात्रीच पडदा टाकला असला, तरी सोशल मीडियातून याची चित्रफीत फिरत असून, या घटनेची उलटसुलट चर्चा सुरू आहे.
निलंबित पोलिस कर्मचारी रुग्णालयात
बेशुद्ध पडलेल्या महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यावेळी महिला पोहोचण्याअगोदरच दोन दिवसांपूर्वी निलंबित केलेला पोलिस कर्मचारी असिफ कलायगार हा रुग्णालयात उपस्थित होता. तो तेथे का उपस्थित होता आणि त्याने कोणती भूमिका पार पाडली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
संबंधित युवती आणि युवक पोलिस ठाण्यात हजर झाले. ही युवती बेपत्ता असल्याची नोंद नांदेड सिटी पोलिस ठाण्यात आहे. युवकाने दहा-बारा लोकांचे टोळके पोलिस ठाण्यासमोर गोळा करून दंगा चालू केला. त्यांना प्रसाद देताना ते पाहून महिला बेशुद्ध पडली. तिच्यावर रितसर रुग्णालयात उपचार करण्यात आले. तसेच दहा-पंधरा लोकांचे यासंदर्भात जबाबही घेण्यात आले. संबंधित युवतीला तिच्या नातेवाइकांकडे पाठविण्यात आले. -सचिन सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक शहापूर पोलिस ठाणे