Kolhapur: तमदलगेच्या डोंगरावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन निमशिरगावच्या तरुणाचा खून, एक संशयित ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:44 IST2025-05-28T12:43:56+5:302025-05-28T12:44:11+5:30
शिरोळ तालुक्यात पंधरा दिवसांत तिसरा खून

Kolhapur: तमदलगेच्या डोंगरावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन निमशिरगावच्या तरुणाचा खून, एक संशयित ताब्यात
जयसिंगपूर : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने डोक्यात वार करून तमदलगे येथील बसवान खिंडीत असणाऱ्या डोंगरावर खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. अविनाश ऊर्फ दीपक ओमगोंडा पाटील (वय ३५, रा.सांगली बायपास रोड निमशिरगाव) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान करून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास खून झाल्याची शक्यता आहे.
फिरायला जाणाऱ्या नागरिकांना मोटारसायकल उभी असल्याची दिसली. तेथूनच पुढे वीस फूट अंतरावर मृतदेहदेखील दिसून आला. घटनेची माहिती पोलिस पाटील अमोल कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मृत अविनाश याच्या पायातील चप्पल तसेच होते. यावरून खुनाच्या वेळी झटापट झाली असावी, असे चित्र होते. तीक्ष्ण हत्याराच्या माऱ्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असे दिसून आले.
घटनेचे गांभीर्य घेऊन पोलिसांनी तातडीने कुटुंबीयांसह मित्रपरिवाराकडे चौकशी करून तपास गतिमान केला. याप्रकरणी एका संशयिताला तपासासाठी ताब्यात घेतले आहे तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. अविनाश याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक सत्यवान हाके म्हणाले, घटनेची चौकशी सुरू असून लवकरच खुनाचे कारण व संशयितांना अटक केली जाईल.
डोक्यात वर्मी घाव
तमदलगे हद्दीतील डोंगर परिसर निर्मनुष्य आहे. त्यामुळे घटना घडत असताना कोणालाही याची पुसटशीही कल्पना आली नाही. त्यामुळे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले नसल्याचे पुढे आले आहे. आर्थिक देवाण-घेवाणीतून खून झाला असावा, अशी शक्यता गृहित धरून पोलिस तपास करत आहेत.
पंधरा दिवसांत तिसरा खून
शिरोळ तालुक्यात शिरोळ, हरोलीनंतर आता तमदलगे येथे खुनाची घटना घडली आहे. गेल्या पंधरा दिवसांत या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुका चर्चेत आला आहे.