कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 15:57 IST2025-10-18T15:56:56+5:302025-10-18T15:57:12+5:30
शाहूपुरी पोलिसांची कारवाई : दोन लाखांवर मुद्देमाल जप्त

कोल्हापुरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या तरुणास अटक, चौकशीत दिली उडवा उडवीची उत्तरे
कोल्हापूर : कदमवाडीत रस्त्याकडेला बेकायदेशीरपणे एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी आल्याप्रकरणी ऋषीकेश प्रफुल्ल जाधव ( वय २८, गीता अपार्टमेंट, घाटगे कॉलनी, कोल्हापूर) यास गुरुवारी शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पांढरट साखरेची बारीक पावडर वजा खड्याप्रमाणे दिसणारा एमडी ड्रग्जसदृश ४.३ ग्रॅम पदार्थ, पारदर्शक पिशवी, एक मोबाइल फोन, बुलेट असा एकूण २ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मुख्यालयातील पोलिस मिलिंद नानासाहेब टेळी यांनी याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी सांगितले की, कदमवाडीत मुख्य रस्त्यावर एकजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पथक करून सापळा रचला. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास बुलेटवरून एकजण आला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने ऋषीकेश जाधव असे नाव सांगितले. त्याने माझा धंदा ड्रायव्हिंग असून, घाटगे कॉलनीत राहत असल्याची माहिती दिली.
पोलिस निरीक्षक संतोष डोके यांनी त्याची सखोल अंगझडती घेतली. यात त्याच्या शर्टाच्या खिशात एक मोबाइल, एक प्लॅस्टिकची लहान पिशवी मिळून आली. पिशवीत पांढरट रंगाची साखरेसारखी बारीक पावडर, खड्यासारखा पदार्थ दिसून आला. डोके यांनी त्याला यासंबंधी विचारणा केली. त्यावेळी संशयित आरोपी जाधव यांनी प्लॅस्टिक पिशवीत एमडी ड्रग आहे. ते मी विक्रीसाठी आणले आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर पंचासमक्ष मुद्देमाल जप्त केला.
एमडी ड्रग्ज किंवा....
जप्त केलेल्या पदार्थाची तपासणी करून घेण्यासाठी जागेवरच न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळेच्या उपसंचालकांना बोलवून घेतले. त्यांनी प्रथमदर्शनी एम. डी. ड्रग किंवा मेथाम्फेटामाइन, मेथाक्वॉलोन, ॲम्फिटामाइनसदृश पदार्थ असू शकतो, असा निष्कर्ष काढला. पोलिस निरीक्षक डोके यांनी आरोपी जाधव यांच्याकडे ड्रग्जचा साठा कोठे करून ठेवला आहे, अशी विचारणा केली. मात्र त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
मुंबईहून आणल्याची माहिती
एमडीसदृश अमली पदार्थ मुंबई येथून विकत घेतले. हा पदार्थ ग्राहकांना विक्री करीत असतो, अशी माहिती संशयित आरोपी जाधव यांनी पोलिसांना दिली. या प्रकरणाचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.