Kolhapur Crime: पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला, तरुण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:08 IST2025-12-05T13:06:09+5:302025-12-05T13:08:43+5:30
संशयित हल्लेखोर कोयता टाकून पळून गेले

Kolhapur Crime: पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला, तरुण जखमी
हातकणंगले : कोल्हापूर-सांगली रोडवरील इचलकरंजी फाट्यानजीक एका चहा टपरीवर गुरुवारी रात्री ८ वाजता पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून कृष्णात नामदेव खोत (वय ३६, रा. हातकणंगले, खोतवाड) यांच्यावर विकी घोरपडे, प्रकाश एडके आणि दोघा साथीदारांनी कोयत्याने हल्ला केला. संशयित हल्लेखोर कोयता टाकून पळून गेले आहेत. यामध्ये कृष्णात खोत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, कृष्णात खोत विवाहित आहे. मात्र, त्याची पत्नी नांदत नसून बरीच वर्षे माहेरीच राहते. संशयित विकी घोरपडे (रा. तारदाळ, खोतवाडी) याची हातकणंगले येथील पाच तिकटी परिसरात पानटपरी आहे. त्याची कृष्णातशी मैत्री झाली होती. मात्र, कृष्णातने विकीच्या पत्नीलाच फूस लावून पळवून नेले होते. यातून विकीचा त्याच्यावर राग होता.
गुरुवारी रात्री ८ वाजता चहा टपरी येथे संशयित आराेपी आणि कृष्णात यांच्यात वादावादी झाली. यावेळी कृष्णातवर कोयत्याने वार करण्यात आले. यात ताे गंभीर जखमी झाला. यानंतर संशयित पसार झाले. जखमी कृष्णातला हातकणंगले ग्रामीण रुग्णालयांत उपचारासाठी दाखल केले.
कृष्णातची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेबाबत माहिती मिळताच हातकणंगले पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.