छतावरून दिडशे फूट खाली पडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात घडली दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 16:36 IST2022-11-11T16:33:12+5:302022-11-11T16:36:31+5:30
जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

छतावरून दिडशे फूट खाली पडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यात घडली दुर्घटना
राजेंद्र पाटील
भोगावती : परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यात पत्र्याचे काम करत असताना खाली पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदाशिव यशवंत सुतार (वय ५५, रा.कुरुकली ता.करवीर) असे मृत कामगाराचे नाव आहे. आज, शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी साडे दहा वाजता सुतार हे कारखान्याच्या सिव्हील विभागाकडील दिडशे पेक्षा अधिक उंचीवर साखर पडते त्याठिकाणी असणाऱ्या पत्र्यावर काम करत होते. सेफ्टीकिंट, हेल्मेटसह दोरी बांधून ते पत्र्यावर चढले होते. परंतू पत्राच फुटल्याने सुतार दिडशे फूटावरुन खाली पडले.
सुतार यांच्या डोक्याला मानेला गंभीर इजा झाली होती. जखमी अवस्थेत त्यांना कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.