Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:29 IST2025-06-02T13:25:57+5:302025-06-02T13:29:16+5:30

जयसिंगपुरातील नितीन जंगम यांना गंडा 

A woman from Shivaji Peth, Kolhapur, was arrested for defrauding a businessman from Jaysingpur of Rs 43 lakhs with the lure of a loan | Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक

Kolhapur: कर्जाच्या आमिषाने ४३.७४ लाखांची फसवणूक, शिवाजी पेठेतील महिलेस अटक

कोल्हापूर : व्यवसायासाठी कर्ज मिळवून देण्यासह बँकांमधील तारण लिलावाचे सोने आणि कार कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवून एका महिलेने नितीन दिलीप जंगम (वय ४०, रा. पुजारी गल्ली, जयसिंगपूर, ता. शिरोळ) यांची ४३ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार जून ते डिसेंबर २०२४ या काळात घडला. जंगम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी स्नेहा संजय नारकर (३५, रा. संध्यामठ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) या महिलेला रविवारी (दि. १) अटक केली.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नितीन जंगम हे जयसिंगपुरातील सिद्धेश्वर मंदिराचे पुजारी आहेत. त्यांचा इचलकरंजीत ब्युटी स्पाचा व्यवसाय आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी त्यांना कर्जाची आवश्यकता होती. जून २०२४ मध्ये स्पामध्ये येणारी महिला स्नेहा नारकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कमी व्याज दरात कर्ज मिळवून देण्याचे काम करीत असल्याचे सांगत तिने जंगम यांचा विश्वास संपादन केला.

एका राष्ट्रीयीकृत बँकेतून दीड कोटी रुपयांचे व्यावसायिक कर्ज मिळवून देण्याचे आमिष तिने दाखवले, तसेच बँकांमध्ये तारण ठेवलेले कर्ज आणि कार लिलावातून कमी किमतीत मिळवून देऊ असे सांगितले. यासाठी प्रोसेसिंग फी आणि स्टँप फी म्हणून वेळोवेळी पैशांची मागणी केली. शासकीय सवलत आणि अनुदानातून व्याजात ६० टक्के सवलत देण्याचेही आमिष दाखवले.

सात महिन्यांत ऑनलाइन, आरटीजीएस, एनईएफटीसह नारकर यांच्या बँक खात्यात प्रत्यक्ष रक्कम भरूनही कर्ज मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे जंगम यांच्या लक्षात आले. त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, नारकर दाम्पत्याने पैसे परत देण्यास नकार दिला. त्यानंतर जंगम यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी नारकर हिला अटक केली असून, न्यायालयात हजर केले असता तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली.

कर्ज काढून पैसे दिले

जंगम यांनी स्वत:कडील आणि दोन मित्रांकडील रक्कम नारकर हिला दिली. त्यानंतरही पैशांची मागणी सुरूच राहिल्याने त्यांनी आईच्या नावे पतसंस्थेतून २२ लाखांचे कर्ज काढून ती रक्कम नारकर हिला दिली. २२ जुलै ते २० डिसेंबर २०२४ या काळात त्यांनी २९ ट्रान्जेक्शनद्वारे ४३ लाख ७४ हजार रुपये दिले.

व्यवसायावर परिणाम

जंगम यांचा इचलकरंजीतील व्यवसाय चांगला चालला होता. दीड कोटीचे कर्ज काढून त्यांना स्पाच्या शाखा सुरू करायच्या होत्या; पण कर्ज मिळवण्याच्या प्रयत्नात जंगम कर्जबाजारी झाल्याने त्यांच्या जुन्या व्यवसायावरही परिणाम झाला. या गुन्ह्यात स्नेहा नारकर हिला मदत करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी दिली.

Web Title: A woman from Shivaji Peth, Kolhapur, was arrested for defrauding a businessman from Jaysingpur of Rs 43 lakhs with the lure of a loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.