कोल्हापुरातील शेतकरी महिलेने ३० गुंठ्यातील सोयाबीनच्या उभ्या पिकावर फिरवला ट्रॅक्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:14 IST2025-10-06T14:12:20+5:302025-10-06T14:14:33+5:30
संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे

छाया- संजय पाटील
देवाळे (जि. कोल्हापूर) : मोहरे (ता. पन्हाळा) येथील शेतकरी महिलेने उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. तीस गुंठ्यात जूनमध्ये सोयाबीन पीक घेतले होते. नदीला आलेल्या महापुरामुळे सोयाबीन पीक पाण्याखाली गेल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हतबल शेतकरी महिलेने सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला.
मोहरे येथील गट नंबर १७८ ब मधील ३० गुंठ्यामध्ये शेतकरी महिला भारती बाबुराव पवार यांनी जून महिन्यात सोयाबीनचे पीक घेतले होतं. सोयाबीनचे पीक चांगले जोमदार आले होते. जून महिन्यापासून सततच्या पावसामुळे वारणा नदीला दोन वेळा महापूर आल्याने शेती पाण्याखाली गेली होती. यामुळे सोयाबीन पीकाचे मोठे नुकसान झाले. हतबल होवून शेतकरी महिलेने पीक पुन्हा वाढवण्याचा खर्च वाया घालवण्याऐवजी पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याचा निर्णय घेतला. अन् उभ्या सोयाबीन पिकावर टॅक्टर फिरवत रोष व्यक्त केला.
शेतकऱ्याने शेतात सोयाबीन पिकावर आतापर्यंत १० ते १५ हजारांचा खर्च केला होता. तरीही सोयाबीन पिकातून काहीच हाती लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर टोकाचे पाऊल उचलले आणि सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. शेतकऱ्यांना संकटातून सावरण्यासाठी सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे.