Kolhapur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफनभूमीत पुरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 11:52 IST2025-03-06T11:49:57+5:302025-03-06T11:52:08+5:30

पत्नीसह चौघांना अटक; अनैतिक संबंधाचा संशय 

A wife killed her husband with the help of her lover in Dharangutti in Kolhapur | Kolhapur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफनभूमीत पुरला

Kolhapur Crime: प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून, पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह दफनभूमीत पुरला

शिरोळ : धरणगुत्ती (ता. शिरोळ) येथे अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने पत्नीने पतीचाच खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. संजय अल्लाबक्ष शिकलगार (३८, मूळ गाव यादवनगर जयसिंगपूर, सध्या रा.लक्ष्मीनगर, धरणगुत्ती) असे मृताचे नाव आहे.

धारदार कोयत्याने मानेवर व डोक्यात वार करून खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह दफनभूमीत पुरण्यात आला होता. याप्रकरणी प्रियकर दर्शन भगवान कांबळे, अमृत भगवान कांबळे, स्वागत विजय कांबळे व पत्नी दीपा संजय शिकलगार यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खुनाच्या या घटनेनंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

संजय हा गोवा राज्यात गवंडी काम करत होता. पत्नीच्या अनैतिक संबंधावरून दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. यातूनच गुरुवारी (दि. २७) रात्री ८ वाजेच्या सुमारास संजय याला घरातून पत्नी दिपा, दर्शन कांबळे व त्याचा भाऊ अमृत व चुलता स्वागत कांबळे यांनी घेऊन धरणगुत्ती येथील माळभागावरील पाण्याच्या टाकीच्या परिसरातील दफनभूमीजवळ आले. त्यानंतर संजयच्या डोक्यात व मानेवर कोयत्याने वार करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेजारीच असणाऱ्या दफनभूमीतील खड्ड्यात पुरण्यात आला. 

घटनेचा उलगडा झाल्यानंतर संशयित दर्शन याला घेऊन मृतदेह पुरलेल्या जागेची पाहणी केली. त्याठिकाणी तहसीलदार अनिलकुमार हेळकर, पोलिस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्यामुळे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

खुनाचा झाला उलगडा

संजय हा गोवा येथे गवंडी काम करत होता. २६ फेब्रुवारी रोजी तो धरणगुत्ती येथे आला होता. २७ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची वर्दी भाऊ अनिल शिकलगार याने ४ मार्च रोजी शिरोळ पोलिस ठाण्यात दिली होती. याचवेळी संजयचा घातपात झाल्याचाही संशय नातेवाइकांनी व्यक्त केला होता. त्यानंतर शिरोळ पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपासाची चक्रे फिरवत पत्नी दीपा, दर्शन कांबळेसह त्याचा भाऊ व चुलत्याला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची घटना उघडकीस आली.

मृतदेह दफनभूमीत पुरला

धरणगुत्ती येथील लिंगायत दफनभूमीजवळ संजय याला घेऊन संशयित चौघेजण आले होते. यावेळी कोयत्याने त्याच्या डोक्यात व मानेवर सपासप वार करून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने याच दफनभूमीतील खड्ड्यामध्ये संजयचा मृतदेह पुरण्यात आला.

Web Title: A wife killed her husband with the help of her lover in Dharangutti in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.