Kolhapur Crime: ‘त्या’ निर्जनस्थळी का गेल्या?; भडगाव येथील महिलेच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 12:16 IST2026-02-13T12:15:58+5:302026-02-13T12:16:39+5:30
‘त्या’ निर्जनस्थळाची पाहणी: ५ संशयित ताब्यात, लवकरच उलगडा

Kolhapur Crime: ‘त्या’ निर्जनस्थळी का गेल्या?; भडगाव येथील महिलेच्या संशयास्पद मृत्यूची कसून चौकशी
गडहिंग्लज : भडगाव येथील महिलेच्या संशयास्पद मृत्यूच्या तपासासाठी कोल्हापूरहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक गडहिंग्लजमध्ये दाखल झाले आहे. गुरुवारी, पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पथकाने महिलेचा मृतदेह सापडलेल्या ‘त्या’ घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी ५ संशयितांची चौकशी केली. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे संकेत पोलिस सूत्रांकडून मिळाले आहेत.
अधिक माहिती अशी, १८ जानेवारी २०२६ रोजी भडगाव येथील सुनीता संजय केसरकर (वय ४०) या गडहिंग्लजला बाजाराला जातो असे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यांचा मृतदेह महागाव-मासेवाडीदरम्यान घंटीचा झरा नावच्या ओढ्याच्या पात्रात मुंडके नसलेल्या स्थितीत आढळून आला.
दरम्यान, मृत सुनीता यांचे नातेवाईक यांच्याकडूनही पोलिसांनी माहिती घेतली. त्यावरून संशयित ५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यापैकी दोघांवर संशयाची सुई केंद्रित झाली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
कॉल डिटेल्स् मागितले
घटनास्थळी मुंडके नसलेला मृतदेह, चप्पल, साडी, बांगड्या, हातातील काळा दोरा इत्यादी वस्तू सापडल्या होत्या. त्यावरूनच मृतदेहाची ओळख पटली आहे. मात्र, सुनीताकडे असणारा मोबाइल घटनास्थळी नव्हता. त्यामुळे तिच्या मोबाइलवरील संभाषणाचे कॉल डिटेल्स् व तिचे शेवटचे लोकेशन याची माहिती पोलिसांनी संबंधित मोबाइल कंपनीकडे मागितली आहे.
श्वापदांनी लचके तोडले?
महागाव-मासेवाडीदरम्यान मठपती यांच्या शेतालगतच्या ओढ्याच्या पात्रातील झुडपात सुनीताचा मृतदेह तब्बल २५ दिवसांनी सडलेल्या स्थितीत सापडला. तिच्या शरीरावर शीर नव्हते. डोक्याची कवटी व हनुवटी बाजूला पडली होती. डोक्याचे केस काटेरी झुडपात अडकले होते. त्यामुळे जंगली श्वापदांनी मृतदेहाचे लचके तोडले असावेत, असा संशय शवविच्छेदन केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘त्या’ निर्जनस्थळी का गेली?
गडहिंग्लजच्या आठवडा बाजारासाठी सुनीता हिने अडीच हजार रुपये बँकेतून काढले होते. त्यातून तिने बाजारही केला होता, अशी माहिती पोलिसांकडून मिळाली. मात्र, बाजार करून घरी जाण्याऐवजी ती महागाव परिसरातील ‘त्या’ निर्जनस्थळी का गेली? किंवा तिकडे नेऊन तिचा कुणी घात केला का? याचा तपास स्थानिक पोलिसांच्या मदतीने गुन्हे अन्वेषणाचे पथक करीत आहे.