Kolhapur News: विद्यार्थिनींशी गैरकृत्य करणारा शिक्षक अटकेत, खांद्यावर, खिशात हात घालून करायचा अश्लील चाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 12:56 IST2023-01-31T12:07:58+5:302023-01-31T12:56:43+5:30
समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासूरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा प्रकार उघडकीस आला

Kolhapur News: विद्यार्थिनींशी गैरकृत्य करणारा शिक्षक अटकेत, खांद्यावर, खिशात हात घालून करायचा अश्लील चाळे
तुरंबे : राधानगरी तालुक्यातील शेळेवाडी येथील माध्यमिक शाळेतील एका शिक्षकाकडून मुलींच्या असाह्यतेचा फायदा घेत चुकीचे वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली. तर आज या शिक्षकास पोलिसांनी अटक केली. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
विजयकुमार परशुराम बागडी (वय-५२ मुळ गाव सोळांकूर, सध्या रा. फुलेवाडी कोल्हापूर) असे अटक केलेल्या या शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर काही तासातच पोलिसांनी संशयित शिक्षकाला अटक केली.
नववी आणि दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्याने त्रास दिल्याचे समोर आले. मात्र, हा प्रकार एक महिन्यापूर्वी घडला आहे. समुपदेशन करण्यासाठी आलेल्या समुपदेशक गीता हासूरकर यांनी मुलींना विश्वासात घेऊन माहिती घेताना हा प्रकार उघडकीस आला.
शाळेतील ९ वी आणि १० वीच्या वर्गातील मुलींना हा शिक्षक संबंधित विद्यार्थिनींच्या खांद्यावर हात ठेवणे, खिशात हात घालणे असा गैरप्रकार करत होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याने गैरकृत्य केल्याच्या घटनेची चर्चा ग्रामस्थांच्यात होती. याबाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे ग्रामस्थांनी या संस्थेच्या कार्यालयात धाव घेतली. संस्थेने तत्काळ त्या शिक्षकाची बदली केली.
शिक्षकाची तत्काळ बदली
काही ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने संबंधित शिक्षकाची बदली करून घडल्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. संबंधित शिक्षकाची सध्या सातारा जिल्ह्यात बदली केली आहे, अशी माहिती पोलिस पाटील श्रीपती पाटील यांनी दिली.