परीक्षेच्या तणावातून शिरोळमधील विद्यार्थिनीने संपविले जीवन; तालुक्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 12:40 IST2025-02-12T12:40:27+5:302025-02-12T12:40:46+5:30
शिरोळ/कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. परीक्षेच्या तणावातून नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या ...

परीक्षेच्या तणावातून शिरोळमधील विद्यार्थिनीने संपविले जीवन; तालुक्यात एकाच दिवशी तीन आत्महत्या
शिरोळ/कुरुंदवाड : शिरोळ तालुक्यात मंगळवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येच्या घटना घडल्या. परीक्षेच्या तणावातून नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमृता संतोष आंबेकर (वय १९, रा. इंदिरानगर, शिरोळ) असे तिचे नाव असून, या घटनेची नोंद शिरोळ पोलिस ठाण्यात झाली आहे.
अमृता ही जयसिंगपूर येथील एका कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेत होती. बुधवार (दि. १२)पासून तिची परीक्षा सुरू होणार होती. मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. वडील संतोष जनार्दन आंबेकर यांनी तत्काळ तिला वैद्यकीय मदत मिळविण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत उशीर झाला होता. तिचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. परीक्षेच्या तणावातून तिने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री उशिरा तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अधिक तपास शिरोळ पोलिस करीत आहेत.
तेरवाड (ता. शिरोळ) येथील सुखदेव श्रीपती मगदूम (४२) यांनी गट नंबर २६३ मधील शेताच्या बांधावर असलेल्या उंबराच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मंगळवारी (दि. ११) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रावसो बल्लू मगदूम यांनी या घटनेची वर्दी येथील पोलिसांत दिली आहे.
तिसऱ्या घटनेत कुरुंदवाड येथील विद्यासागर राजगोंडा पाटील (३८) याने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. या घटनेची वर्दी सचिन सातगोंडा पाटील यांनी येथील पोलिसांत दिली आहे.