Kolhapur: पंचगंगा प्रदूषण प्रश्नी पर्यावरण मंत्र्यांकडून दखल, उद्या विशेष बैठकीचे आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2025 16:57 IST2025-03-06T16:56:01+5:302025-03-06T16:57:23+5:30
कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व ...

संग्रहित छाया
कुरुंदवाड : पंचगंगा नदीला शहरातील व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे पंचगंगा नदी गटारगंगा बनली असल्याने व लोकमतने नदी प्रदूषणावर वारंवार आवाज उठविल्याने आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हा प्रश्न विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. त्यामुळे याची दखल घेतली असून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी या विषयावर चर्चा करण्यासाठी ७ मार्च रोजी विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामुळे या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
पंचगंगा नदीपात्रात कोल्हापूर व इचलकरंजी महापालिका सांडपाणी व औद्योगिक वसाहतीत सांडपाणी विनाप्रक्रिया नदीपात्रात सोडले जात असल्याने पंचगंगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीवरील बंधारा दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाटबंधारा विभागाने धरणातील पाण्याचा विसर्ग रोखला आहे. परिणामी शहर व औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी नदीपात्रात येत असल्याने पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे.
दूषित पाण्यामुळे नदीकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय प्रदूषित पाण्यामुळे शेतीही नापीक होत आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबाबत लोकमतने वारंवार आवाज उठविल्याने व वस्तुस्थिती आणि नागरिकांचा रोष ओळखून आमदार यड्रावकर यांनी विधानसभा अधिवेशनात हा विषय लावून धरला व नदी पुनरुज्जीवन प्रकल्प राबविण्याची मागणी केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यावरणमंत्री मुंडे यांनी या विषयावर सविस्तर चर्चा करुन ठोस निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. ७) विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीला पर्यावरण विभाग, जलसंपदा विभाग व स्थानिक प्रशासनाचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने या बैठकीतील निर्णयाकडे शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
प्रदूषणामुळे जीवन धोक्यात
प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठच्या लोकांना त्वचारोगांसह विविध आजारांचे लागण होत आहे. शिवाय रसायनयुक्त पाण्यामुळे शेतजमिनीवर विपरित परिणाम होऊन नापिक बनत आहे. या नदीपात्रात मच्छीमार करुन जगणारे बागडी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र प्रदूषित पाण्यामुळे सर्वच घटकांचे जीवन धोक्यात आले आहे.
नागरिकांच्या आशा पल्लवित
पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न प्रत्येक लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद निवडणुकीत चर्चेला येतो. निवडून आल्यानंतर प्रत्येक लोकप्रतिनिधींकडून या ज्वलंत प्रश्नाकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केल्याने पंचगंगा काठच्या नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र आमदार यड्रावकर यांनी या प्रश्नावर कितपत आग्रही राहतात यावरच या प्रश्नांची निर्गत होणार आहे.