Kolhapur News: शॉर्टसर्किटची आग, सिलिंडर स्फोटाने भडकली; अडीच लाख रुपये जळाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 12:07 IST2026-01-07T12:07:17+5:302026-01-07T12:07:41+5:30
सुमारे १५ लाखांचे नुकसान

Kolhapur News: शॉर्टसर्किटची आग, सिलिंडर स्फोटाने भडकली; अडीच लाख रुपये जळाले
कोल्हापूर : राजारामपुरी येथील शाहूनगरमध्ये नवश्या मारुती मंदिरामागे एका घरात शॉर्ट सर्किटने लागलेली आग गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भडकली. मंगळवारी (दि. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास लागलेल्या आगीत रशीद मक्तुम सय्यद (वय ५३, रा. शाहूनगर, राजारामपुरी) यांच्या घरातील अडीच लाखांची रोकड आणि संसारोपयोगी साहित्य जळाले. यात सुमारे १५ लाखांचे नुकसान झाले. एकमेकांना लागून घरे असलेल्या गल्लीत अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला.
कसबा बावडा येथील कचरा प्रकल्पावर काम करणारे रशीद सय्यद हे त्यांची पत्नी रेश्मा, मुलगा रमजान आणि मेहुणी सैनाज यांच्यासह शाहूनगर येथील घरात राहतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सय्यद दाम्पत्य कचरा प्रकल्पावर कामासाठी गेले होते. सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांच्या मेहुणी मुलाला शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. साडेदहाच्या सुमारास त्यांच्या घरातून धुराचे लोट बाहेर येऊ लागले.
हा प्रकार लक्षात येताच शेजारी राहणा-या त्यांच्या बहिणीने आणि भाच्याने कुलूप तोडून दार उघडताच आगीच्या ज्वाळा बाहेर आल्या. घरातील कपडे आणि प्लास्टिकच्या कागदांमुळे काही क्षणात आगीने रौद्र रूप धारण केले. वर्दी मिळताच आठ ते दहा मिनिटांत अग्निशामक दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशामक दलाच्या जवानांसह स्थानिक तरुणांनी दोन तास शर्थीचे प्रयत्न करून आग विझवली. मात्र, या आगीत सय्यद यांची अडीच लाखांची रोकड जळाली. दोघांच्या पगारातून साठवलेली रोकड सय्यद दाम्पत्याने एका पिशवीत ठेवली होती. या पिशवीतील बहुतांश नोटा जळून खाक झाल्या. तसेच कपडे, संसारोपयोगी साहित्य, टीव्ही, कपाट जळाले. गॅस सिलिंडरच्या स्फोटाने घराचा पत्रा उडून बाजूला पडला. आगीत सुमारे १५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती राजारामपुरी पोलिसांनी दिली. शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीनंतर गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या जवानांनी दिली.
दोन तास शर्थीचे प्रयत्न
स्टेशन अधिकारी जयवंत खोत, विजय सुतार यांच्यासह फायरमन नीतेश शिणगारे, आशिष माळी, संग्राम मोरे, प्रवीण ब्रह्मदंडे, अनिल बागुल, विशाल चौगुले, चालक उमेश जगताप, रमजान पटेल आणि अशोक साठे यांनी दोन तासांत आग विझवली. अग्निशामक दलाचे तीन बंब, दोन टँकर आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी उपस्थित होती. एकमेकांना लागून घरे असलेल्या गल्लीत लागलेली आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरण्याचा धोका होता. मात्र, जवानांनी वेळीच आग विझवल्याने मोठा धोका टळला.
आक्रोश आणि भीती
आगीने रौद्र रूप धारण करताच आजूबाजूच्या घरांमधील लोकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. काही मिनिटांत या परिसरात आक्रोश, आरडाओरडा आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले. धोका ओळखून काही तरुणांनी शेजारच्या घरांमधील गॅस सिलिंडरच्या टाक्या बाहेर काढल्या. डोळ्यांसमोर घर जळताना पाहून सय्यद दाम्पत्याने आक्रोश केला.