Kolhapur News: घरावर गेलेला चेंडू काढायला गेला, अन्...; शाळकरी मुलाच्या मृत्यूने उजळाईवाडीत हळहळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 19:41 IST2025-12-05T19:39:58+5:302025-12-05T19:41:48+5:30
शिक्षकांचा संप सुरू असल्याने आज, शाळेला सुट्टी असल्याने मोहम्मद आपल्या मित्रासह क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता.

Kolhapur News: घरावर गेलेला चेंडू काढायला गेला, अन्...; शाळकरी मुलाच्या मृत्यूने उजळाईवाडीत हळहळ
उचगाव: क्रिकेट खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेलेल्या शाळकरी मुलाचा उच्चदाब विद्युत तारेला स्पर्श होऊन जागीच मृत्यू झाला. मोहम्मद अफान बागवान (ठाकूर) (वय-१३ रा. उजळाईवाडी ता. करवीर) असे मृत मुलाचे नाव आहे. आज, शुक्रवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत होती. घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलस ठाण्यात झाली आहे.
उजळाईवाडी बालाजी पार्क येथे अफान बागवान कुटुंबिय राहतात. मोहम्मद हा इयत्ता सातवी मध्ये शिकत होता. शिक्षकांचा संप सुरू असल्याने आज, शाळेला सुट्टी असल्याने मोहम्मद आपल्या मित्रासह क्रिकेट खेळण्यासाठी गेला होता. खेळताना चेंडू शेजारच्या घरावर गेला. तो आणण्यासाठी वर गेला असता घराच्या अगदी दीड ते दोन फूट अंतरावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विद्युत तारेला त्याचा स्पर्श झाल्याने जबर धक्का बसून जागीच ठार झाला.
ही घटना समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचे वडील औद्योगिक वसाहतीत कामाला आहेत. तर दोन बहिणी व आई गृहिणी आहे. त्याचा स्वभाव अत्यंत मनमिळावू होता. तसेच तो अभ्यासतही खूप हुशार होता. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आई-वडील आणि कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.