Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:21 IST2025-01-31T13:18:14+5:302025-01-31T13:21:29+5:30

एकुलत्या मुलाच्या जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

A school student died on the spot in a speeding two-wheeler accident in Radhanagari Kolhapur district | Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार

Kolhapur: भरधाव दुचाकीची संरक्षक कठड्याला धडक, शालेय विद्यार्थी जागीच ठार

शिरगाव : ज्याच्याकडे बघूनच आई-वडिलांचे पोट भरू शकेल, असा एकुलता देखणा मुलगा मोरीच्या संरक्षक कठड्याला मोटारसायकलची जोरात धडक बसल्याने झालेल्या अपघातात शुक्रवारी सकाळी जागीच ठार झाला. अभिनव शरद गौड (वय १६, रा. शिरगाव) असे त्याचे नाव आहे. राशिवडे खुर्द ते पुंगावदरम्यान मठाचे शेताजवळ हा अपघात झाला.

तोंडावर आलेल्या दहावी परीक्षेच्या आधीच विद्यार्थ्याच्या मृत्यूने गौड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी-आजोबा, चुलते, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, रविवारी (दि.२) आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, अभिनव कामानिमित्त नातेवाइकांकडे मोटारसायकलवरून पुंगावला निघाला होता. राशिवडे खुर्द बेले ते पुंगाव दरम्यान मठाचे शेत नावाच्या मोरीच्या संरक्षक कठड्याला मोटारसायकलची जोरात धडक बसल्याने तो गाडीवरून दूर फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.      
                  
अभिनव हा सरवडे येथील किसनराव मोरे हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होता. त्याचा गावातही मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अचानक जाण्याने गाव हळहळला. गोपाळ बुवा व्यापारी मंडळाच्या व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून त्याला श्रद्धांजली वाहिली. अभिनव याचे वडील शरद गौड हे पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत. घटनेची फिर्याद निखिल तानाजी गौड यांनी दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मोरे करत आहेत.

आईने फोडला हंबरडा..

अभिनव याला चांगले शिकवून अधिकारी करण्यासाठी आई-वडिलांनी फक्त एका मुलावरच शस्त्रक्रिया केली. त्याच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. तो बाहेर जाताना घरी आईला सांगून जात होता. आईने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला, पण लगेचच येतो म्हणून गेलेल्या अभिनवचे पार्थिवच पाहण्याची वेळ आली. त्यामुळे आईने फोडलेला हंबरडा काळीज चिरत गेला.

दु:खाला पारावर राहिला नाही..

गौड परिवारातील अनेक पै-पाहुणे परिसरात आहेत. अभिनवचा अपघातात मृत्यू झाल्याचे समजताच सारेजण शिरगावला आले. पार्थिव घरी आणल्यानंतर साऱ्यांचाच अश्रूंचा बांध फुटला. जो तो एकमेकांना धीर देत होता. आजोबा-आज्जीची स्थिती तर केविलवाणी झाली. त्यांना शब्द फुटत नव्हते. कुणाच्याच दु:खाला पारावर राहिला नव्हता..

Web Title: A school student died on the spot in a speeding two-wheeler accident in Radhanagari Kolhapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.