Kolhapur: नेत्यांच्या काव्य मैफलीत दोस्ती, कुस्ती, मान, भक्ती अन् शक्ती; तिकीटवाटप, गोंधळाला वैतागलेले नेते झाले रिलॅक्स
By समीर देशपांडे | Updated: January 1, 2026 18:38 IST2026-01-01T18:28:36+5:302026-01-01T18:38:27+5:30
समीर देशपांडे कोल्हापूर : सरते २०२५ साल संपताना कोल्हापूर महापालिकेच्या उमेदवारी निवडीची धामधूम सर्वच राजकीय पक्षांत सुरू होती. अशातच ...

Kolhapur: नेत्यांच्या काव्य मैफलीत दोस्ती, कुस्ती, मान, भक्ती अन् शक्ती; तिकीटवाटप, गोंधळाला वैतागलेले नेते झाले रिलॅक्स
समीर देशपांडे
कोल्हापूर : सरते २०२५ साल संपताना कोल्हापूर महापालिकेच्या उमेदवारी निवडीची धामधूम सर्वच राजकीय पक्षांत सुरू होती. अशातच महायुतीच्या पत्रकार परिषदेच्या वेळी सोमवारी कुणीतरी ‘लोकमत’च्या वर्षअखेरीच्या काव्यमैफलीची आठवण करून दिली. यंदा या समन्वयाची जबाबदारी पालकमंत्री म्हणून प्रकाश आबिटकर यांच्यावर देण्यात आली. त्याचवेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, ही मैफल माझ्या खात्याने शेंडा पार्कात नवीन चकचकित ऑडिटोरियम बांधले आहे, त्याच ठिकाणी घ्या. निरोप दिले गेले. अर्ज भरण्याची मुदत संपल्याने नेतेमंडळीही जरा रिलॅक्स होणार होती. तिकीट वाटपाच्या झटापटीत कावलेल्या नेत्यांनाही जरा विरंगुळा पाहिजे होता. अखेर शेंडा पार्कात मैफल ठरली.
बुधवार, ३१ डिसेंबरची संध्याकाळ सहाची वेळ. नेत्यांच्या ४०००, ९००, १६००, ७४७४ अशा नंबरच्या गाड्या झोकात शेंडा पार्कात येऊ लागल्या. नवे करकरीत सभागृह फुल्ल झाले होते. नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी आधीच जागा धरलेल्या. त्यात दक्षिण आणि कागलातील कार्यकर्ते अधिकच होते. व्यासपीठावर सर्व स्थानापन्न झाले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर उठले. त्यांनी स्वागत केले आणि कवितांना सुरूवात झाली. अर्थात, पहिला मान खासदार शाहू छत्रपतींना देण्यात आला. त्यानंतर प्रोटोकाॅलनुसार प्रत्येकाला संधी मिळणार होती. शाहू छत्रपतींनी व्यासपीठावर नजर फिरवली आणि ते म्हणाले,
महायुती, महाविकास विषय निवडणुकीपुरता असावा
कोल्हापूरचा विकास हाच अजेंडा डोक्यात असावा
सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
मग नंबर होता पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा. ते म्हणाले,
युवा ग्रामीणचा मी एक अध्यक्ष, दुवा मिळाला जनतेचा
राधानगरी, भुदरगड, आजऱ्यामुळे मुकुट पालकमंत्रीपदाचा
मंत्री हसन मुश्रीफ उठले. ते सध्या अधूनमधून शायरी पेश करत असतात. पण यावेळी त्यांनी कविता म्हटली.
कधी दोस्ती, कधी कुस्ती याची मला जाण आहे
त्यामुळेच मला महायुतीमध्ये मोठे स्थान आहे
इतक्यात कागलातनं आलेल्या एकानं शिट्टी घातलीच.
मग मंत्री चंद्रकांत पाटील उभे राहिले. सांगली करून रात्री पुण्याला पोहोचायचं आहे असे सांगून त्यांनी माझी कविता झाली की मी लगेच जाणार असल्याचे सांगून त्यांनी शाहू छत्रपतींची परवानगी घेतली आणि कविता सादर केली.
दिल्लीत नरेंद्र, मुंबईत देवेंद्र, ही आमची शान आहे
त्यामुळे देशात, राज्यात भाजपला मान आहे
भाजपच्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजविल्या आणि मंत्री पाटील बाहेर पडले.
खासदार धनंजय महाडिक कविता सादर करू लागले.
अर्ज भरला, लगेच मागं घेतला, लई करू नका हवा
दोन पावलं मागे आलाय, कृष्णराज माझा छावा
महाडिक समर्थकांनी लगेच घोषणा सुरू केल्या.
यानंतर नंबर होता खासदार धैर्यशील माने यांचा. ते म्हणाले,
गेल्या वर्षी लोकसभेला, अडचण होती खरी
ठाण्याच्या एकनाथांनी, ताकद दिली बरी
म्हणून आमची निवडणुकीची होडी, लागली पैलतीरी
टाळ्या वाजल्या. आमदार राजेश क्षीरसागर उठले. जाकीट ठिकठाक केले आणि म्हणाले,
पालकमंत्रीपदाचा मी होतो दावेदार
पण प्रकाशरावांना मिळाली संधी,
महापालिकेत महायुतीची सत्ता
हीच बदलाची नांदी.
आता सतेज पाटील यांचा नंबर होता. महायुतीच्या गोतावळ्यात ते उठून दिसत होते. ते उठले.
जिल्ह्यात १० विरूध्द १, तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून, तुम्ही फक्त लढ म्हणा
टाळ्यांचा कडकडाट झाला आणि नंबर आला विनय कोरे यांचा. ते शांतपणे उठले, बोलू लागले,
कुठे पक्षनिष्ठा आणि कुठे राहिली आहे भक्ती
ज्यांना कोणी आधार नाही, त्यांना जनसुराज्य शक्ती
दाढीतल्या दाढीत हसत ते खाली बसले आणि राजेंद्र पाटील यड्रावकर उठले. ते म्हणाले,
शिरोळ तालुक्यातील लढाईत, अनेकांनी त्रास दिला
पण जनतेच्या बळावर, विजयाचा लागला गुलाल मला
आता आमदार अमल महाडिक उठले. म्हणाले,
आबिटकर, मुश्रीफ, क्षीरसागर यांच्यासह सर्वांचे
शेंडा पार्कावर लक्ष आहे खास
आयटी पार्क, रूग्णालये, प्रशासकीय इमारतींमुळे
माझ्या दक्षिणचा होणार जोरदार विकास
आमदार चंद्रदीप नरके उठले. त्यांनी महाडिक यांच्याच काही शब्दांचा आधार घेतला. म्हणू लागले,
माझ्या मतदारसंघावर मुश्रीफ साहेबांचे लक्ष आहे खास
जरा हळू हळू जावुया, नको महायुतीला फास
मुश्रीफ गालातल्या गालात खाली बसलेल्या राहुल पाटील यांच्याकडे बघत हसत होते.
आमदार राहुल आवाडे उठले,
दादा, आण्णांच्या मार्गदर्शनाखाली
करेन इचलकरंजीचे नंदनवन
फेब्रुवारीत मुलीचे लग्न आहे
हेच सर्वांना निमंत्रण
सर्वच नेत्यांनी टाळ्या वाजवत आवाडे आणि व्याही होणारे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे अभिनंदन केले.
एवढ्यात चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील उभे राहिले. ते कविता सादर करू लागले,
दुर्गम, डोंगराळ चंदगड तालुक्याला
आधार एकच देवाभाऊ
प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो
हा आमदार शिवाभाऊ
आता नंबर होता आमदार अशोकराव माने यांचा. त्यांनी सर्वांना नमस्कार केला आणि ते कविता सादर करू लागले,
सगळे विचारतात मला, की कोणत्या पक्षाचा मी
जनसुराज्य, शिंदेसेना, भाजप तिघांचीही मला हमी
यावर व्यासपीठावर एकच हशा पिकला आणि शेवटचे कवी म्हणून शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांचे नाव पुकारले गेले. ते म्हणाले,
पाच जिल्ह्यातील गुरूंनी दाखवली मला वाट
त्यांच्या पाठबळावर माझा आमदारकीचा थाट
पुन्हा एकदा हशा पिकला, टाळ्या वाजल्या. इतक्यात मंत्री मुश्रीफ माईकवर आले. माझ्याच खात्याच्या सभागृहात आपण पहिल्यांदा आला आहात. तेव्हा सर्वांच्या चहापानाची व्यवस्था केली आहे. त्याचा आस्वाद घ्यावा, अशी विनंती त्यांनी केली आणि वर्षअखेरची ही मैफल संपली.
(३१ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी शेंडा पार्क येथे न झालेल्या काव्यमैफलीचा हा वृत्तांत)