Kolhapur: रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, अपूर्व उत्साह अन् अखंड जयघोषात अंबामातेची नगरप्रदक्षिणा-video
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 18:24 IST2025-10-01T18:23:51+5:302025-10-01T18:24:10+5:30
जुना राजवाड्यात भेटीचा सोहळा

छाया-आदित्य वेल्हाळ
कोल्हापूर : आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, मुखी अंबामातेचा जयघोष आणि अपूर्व उत्साह अशा वातावरणात करवीरनिवासिनी अंबाबाईचा नगरप्रदक्षिणा सोहळा मंगळवारी रात्री संपन्न झाला. भुरभुरत्या पावसातही भाविकांचा उत्साह मोठा होता.
रात्री साडेनऊ वाजता परंपरेप्रमाणे तोफेची सलामी देऊन वाहनाचे पूजन करून महाद्वारातून अंबाबाईच्या नगरप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवलेल्या अंबाबाईच्या वाहनाचे पूजन खासदार धनंजय महाडिक , जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थानचे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, महादेव दिंडे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर नेहमीच्या मार्गाने प्रदक्षिणा सुरू झाली. महाद्वार चौक, महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडवरून वाहन जुना राजवाडा येथे आले.
नगरप्रदक्षिणा सुरू होण्याआधी संध्याकाळपासूनच नगरप्रदक्षिणा मार्गावर भाविकांकडून फुलांच्या पायघड्या आणि रांगोळ्या काढण्यात येत होत्या परंतु रात्री आठच्या सुमारास बारीक पाऊस सुरू झाल्याने रांगोळ्या भिजल्या परत भाविकांनी फुलांच्या रांगोळ्या काढून देवीचे त्याच उत्साहाने स्वागत केले. अनेक रांगोळ्यांवर प्लास्टिकही झाकण्यात आले. देवीचे वाहन गुजरी, भाऊसिंगजी रोड,भवानी मंडपातून जुना राजवाडा येथे पोहोचले.
महाआरती झाल्यानंतर गुरु महाराज वाडा , बिनखांबी गणेश मंदिर या पारंपरिक मार्गांवरून वाहन महाद्वारमार्गे रात्री साडेबाराच्या दरम्यान अंबाबाईच्या देवळात पोहोचले. त्यानंतर नवरात्रौत्सवाचा पारंपरिक पालखी सोहळा आणि त्यानंतर मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. मध्यरात्री महाकालीसमोर नवचंडी होम झाला.
गुजरी मित्रमंडळातर्फे जगदंबेचे २१ फुटी मुखकमल, ठिकठिकाणी स्वागत
नगरप्रदक्षिणेच्या दरम्यान ठिकठिकाणी विविध संस्था आणि मंडळांच्यावतीने अंबामातेचे स्वागत करण्यात आले. बिनखांबी गणेश मंदिराजवळ शिवाजी पेठ मंडळातर्फे १३ फुटी उभी महाकाली साकारण्यात आली होती तर कोब्रा ग्रुप, पालखी आगमन सोहळा मंडळ गाडगे महाराज चौक, भवानी मंडप येथील यात्री निवास संघटना, बालगोपाल तालीम यांच्यावतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. दरवर्षी नावीन्य जपणाऱ्या गुजरी मित्रमंडळातर्फे जगदंबेचे २१ फुटी मुखकमल साकारण्यात आले होते. त्याच्या दुसऱ्या बाजूला तिरूपतीचे मुखकमल दिसत असल्याने फोटो काढण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी मंडळातर्फे २५०० किलो शिरा वाटप करण्यात आले. याचबरोबर महाद्वार रोडवरील आत्मविश्वास मंडळ, फेथ फाउंडेशन, शिवप्रेमी आझाद मंडळ, कोल्हापूर केटरर्स असोसिएशन यांच्यामार्फत प्रसाद वाटप करण्यात आला.
जुना राजवाड्यात भेटीचा सोहळा
जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात अंबाबाई आणि तुळजाभवानी देवीच्या भेटीवेळी छत्रपती घराण्यातर्फे देवीची ओटी भरण्यात आली. नगरप्रदक्षिणेत सहभागी मानकऱ्यांना मानाचे विडे देण्यात आले. यावेळी संभाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, यशराजराजे, याज्ञसेनीराजे, संयोगीताराजे, मधुरिमाराजे यांची प्रमुख उपस्थिती होती.