कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 16:13 IST2025-10-06T16:12:53+5:302025-10-06T16:13:14+5:30
पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांत केले पुरे : पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला धनादेश

कोल्हापुरातील पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व, अतिवृष्टीग्रस्त बळीराजासाठी दिली दहा लाखांची देणगी
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सेवानिवृत्त प्राध्यापक आणि ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. राम पणदूरकर यांनी मराठवाडा तसेच उत्तर भारतातील भूस्खलन आणि अतिवृष्टीग्रस्त बळीराजांसाठी पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीसाठी दहा लाख रुपयांची देणगी दिली. डॉ. राम यांनी पत्नीने दिलेले वचन पाच महिन्यांतच पूर्ण केले.
दिल्ली येथे पीएमओ, साऊथ ब्लॉक या पत्त्यावर डॉ. पणदूरकर यांनी धनादेशाची रक्कम पाठवली. त्यांच्या पत्नी हेमकिरण यांनी यापूर्वी ८ मे २०२५ रोजी सिंदूर ऑपरेशनसाठी पाच लाख रुपयांची देणगी ‘राष्ट्रीय संरक्षण निधी’साठी दिली होती. त्यावेळी त्यांनी समाज माध्यमांसमोर आपत्तीकाळात देशासाठी आम्ही अजूनही मदत करू, असे आश्वासन दिलेले होते. डॉ. पणदूरकर यांनी पत्नीचे वचन फक्त पाच महिन्यांच्या आतच पूर्ण केले.
पणदूरकर दाम्पत्यांचे दातृत्व
पणदूरकर दाम्पत्यांची दिवंगत कन्या ॲड. डॉ. रूपाली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही देणगी देण्यात आली. शिवाजी विद्यापीठात ६५ लाख रुपयांच्या देणगीतून उभे केलेले रूपाली पणदूरकर यांच्या नावची अभ्यासिका तसेच सैनिकांसाठीही त्यांनी पाच लाख रुपये दिले होते. बळीराजासाठी दहा लाख, शिवाय इतर सामाजिक संस्थांना देणगी आणि लहान मुलींच्या शिक्षणासाठी, सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी काही लाख रुपये देणगी दिली जाते.