Kolhapur news: अधुरी एक कहाणी... लग्नानंतर ४५ व्या दिवशी अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 19:37 IST2026-01-19T19:36:05+5:302026-01-19T19:37:05+5:30

नवविवाहितेच्या अपघाती मृत्यूने ऐनापूरकर हळहळले

A newlywed woman from Gadhinglaj died in an accident in Belgaum just 45 days after her marriage | Kolhapur news: अधुरी एक कहाणी... लग्नानंतर ४५ व्या दिवशी अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

Kolhapur news: अधुरी एक कहाणी... लग्नानंतर ४५ व्या दिवशी अपघातात नवविवाहितेचा मृत्यू

राम मगदूम

गडहिंग्लज : लग्नानंतर अवघ्या ४५ दिवसात बेळगाव येथील अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या नवविवाहितेचा मृत्यू झाला. स्वाती विकास पाटील (वय २५, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज) असे तिचे नाव आहे. या घटनेमुळे ऐनापूरसह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

ऐनापूर येथील विकास जरीगोंडा पाटील व स्वाती आण्णासाहेब माने हे दोघेही एकमेकांच्या नात्यातील आहेत. अभियांत्रिकी पदविका घेतलेला विकास गडहिंग्लजमध्ये मोबाइल शॉपी चालवतो. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतलेली स्वाती येथील श्री रवळनाथ हौसिंग फायनान्स सोसायटीमध्ये नोकरीला होती.

काही वर्षांपासून दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. परंतु, काही कारणांमुळे लग्न लांबणीवर पडत होते. त्यामुळे स्वातीची बहीण स्मिता, भाऊजी सचिन खपले आणि विकासचा भाऊ शिवराज यांनी पुढाकार घेतला. २ डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह पार पडला.
बुधवारी (१४) बैलहोंगल व संपगाव येथील स्वातीच्या मावशीला भेटून दोघेही दुचाकीने देवगिरी येथील आजोळी जात होते. दरम्यान, बेळगावनजीक भरधाव कारगाडीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विकासलाही दुखापत झाली आहे.

दुचाकीवरून रस्त्यावर जोरात आपटल्याने स्वातीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला प्रथम केएलई व नंतर सरकारी दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तिच्या पश्चात पती, सासू, सासरा, दीर, आई, वडील, बहीण व भाऊ असा परिवार आहे.

अधुरी एक कहाणी...

स्वातीचे माहेर व सासर ऐनापुरातच आहे. त्यामुळे स्वाती लग्नाआधीही प्रत्येक सणावाराला विकासच्या घरी जाऊन आईला (सासू) स्वयंपाकासह घरकामात मदत करत असे. गावातील महादेव मंदिरात कोणताही कार्यक्रम असला तरी आजूबाजूच्या महिलांना घेऊन रांगोळी काढायला ती नेहमीच पुढे असायची. स्वाती अत्यंत मनमिळावू व जिद्दी होती. मुख्यमंत्री कौशल्यविकास योजनेतील प्रशिक्षणानंतर ‘रवळनाथ’मध्ये तिला कायमची नोकरी मिळाली होती. मात्र, संसार फुलण्याआधीच तिला काळाने हिरावून नेले. त्यामुळे पाटील व माने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

Web Title : कोल्हापुर: शादी के 45 दिन बाद हादसे में नवविवाहिता की मौत

Web Summary : ऐनापुर की स्वाति पाटिल की शादी के महज 45 दिन बाद बेलगाम के पास एक दुर्घटना में दुखद मौत हो गई। दुर्घटना में उनके पति भी घायल हो गए। स्वाति अपनी मददगार स्वभाव और सामुदायिक भागीदारी के लिए जानी जाती थीं। इस असामयिक मृत्यु से क्षेत्र में शोक की लहर है।

Web Title : Kolhapur: Newlywed Dies in Accident 45 Days After Marriage

Web Summary : A newly married woman from Ainapur, Swati Patil, tragically died in an accident near Belgaum just 45 days after her wedding. The accident also injured her husband. Swati was known for her helpful nature and community involvement. The untimely death has cast a pall of gloom over the region.