Kolhapur Accident: रंकाळ्याजवळ अल्पवयीन कारचालकाने दोघांना उडवले; एक ठार, एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:47 IST2025-12-26T11:46:51+5:302025-12-26T11:47:54+5:30
पिता-पुत्रावर गुन्हा दाखल; अपघातात ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच संदीप पोवार याचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला

Kolhapur Accident: रंकाळ्याजवळ अल्पवयीन कारचालकाने दोघांना उडवले; एक ठार, एक गंभीर जखमी
कोल्हापूर : अल्पवयीन कारचालकाने बेदरकारपणे कार चालवून समोरून आलेल्या दुचाकीला उडवल्याने दुचाकीस्वार संदीप शिवाजी पोवार (वय ३२, रा. आयरेकर गल्ली, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला शैलेश शिवकुमार कदम (३०, रा. राजघाट, शिवाजी पेठ) हा गंभीर जखमी झाला.
हा अपघात मंगळवारी (दि. २३) मध्यरात्रीच्या सुमारास झाला. याप्रकरणी कारमालक श्रीकांत वसंतराव जाधव (४८, साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ) आणि कार चालवून अपघाताला कारणीभूत ठरलेल्या त्याच्या १७ वर्षीय मुलावर जुना राजवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीकांत शिवाजीराव पोवार (३९, रा. आयरेकर गल्ली) यांचा भाऊ संदीप आणि त्याचा मित्र शैलेश कदम हे दोघे दुचाकीवरून साकोली कॉर्नरकडून रंकाळ्याकडे निघाले होते. तवटे वखारीजवळ समोरून आलेल्या भरधाव कारने दुचाकीला उडवले. त्यावेळी दुचाकी चालवणारा संदीप आणि मागे बसलेला शैलेश दोघे उडून बाजूला पडल्याने गंभीर जखमी झाले.
परिसरातील नागरिकांनी तातडीने दोघांना खासगी रुग्णालयात दाखल केले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान बुधवारी रात्री संदीप ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर रात्री उशिरा त्याला मृत घोषित केले. शैलेश याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याप्रकरणी मुलाचे वडील श्रीकांत जाधव आणि त्यांच्या १७ वर्षीय मुलावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या दोघांनाही ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी सांगितले.
संदीपचे अवयवदान
अपघातात ब्रेनडेड झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट करताच संदीप पोवार याचे मरणोत्तर अवयवदान करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यानुसार डॉक्टरांनी पुढील प्रक्रिया राबवली. कठीण प्रसंगातही पोवार कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयाचे डॉक्टरांनी कौतुक केले. तो इलेक्ट्रिशियनची कामे करीत होता. त्याच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
आठवड्यात दुसरा अपघात
अल्पवयीन चालकाने दुचाकीस्वारांना उडवल्याचा आठवड्यात दुसरा अपघात घडला. शनिवारी (दि. २०) मध्यरात्री एकच्या सुमारास उजळाईवाडी उड्डाणपुलाजवळ अल्पवयीन कार चालकाने दुचाकीस्वारांना उडवल्याने गिरगावमधील (ता. करवीर) तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री शहरात आणखी एका अल्पवयीन कारचालकाने दुचाकीस्वाराचा बळी घेतला. आठवड्यात दोन अपघात झाल्याने अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देण्याचा धोका स्पष्ट झाला आहे.