Kolhapur: प्रेमप्रकरणातून रंगेहाथ सापडला, लॉजिंगच्या दारात कौटुंबिक ड्रामा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 14:31 IST2025-06-03T14:30:54+5:302025-06-03T14:31:12+5:30
सागर शिंदे दिंडनेर्ली : कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील हणबरवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ...

Kolhapur: प्रेमप्रकरणातून रंगेहाथ सापडला, लॉजिंगच्या दारात कौटुंबिक ड्रामा
सागर शिंदे
दिंडनेर्ली : कोल्हापूर - गारगोटी मार्गावरील हणबरवाडी (ता. करवीर) येथील एका लॉजमध्ये रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास एक विवाहित तरुण अन्य एका महिलेला घेऊन भेटायला आला होता. काही वेळात तरुणाचे नातेवाईक आल्याने अनैतिक प्रकरण रंगेहाथ सापडले आणि लॉजिंगच्या दारातच कौटुंबिक ड्रामा रंगला.
संबंधित तरुण लॉजिंगमधून शिवीगाळ करतच बाहेर आला. लॉजिंगच्या दारात हाणामारी झाली. या मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची या हाणामारीमुळे नेमके प्रकरण काय झालंय, याची उत्सुकता वाढली होती.
पाठलाग करत असल्याचा संशय घेऊन एका महिलेसह दोघांना मारहाण करून जखमी केल्याबद्दल वरणगे पाडळी येथील व्यक्ती व एका अनोळखी महिलेविरुद्ध इस्पूर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, वरणगे पाडळी येथील युवक आपल्या पत्नीला कौटुंबिक कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून त्रास देत असल्यामुळे त्याला भेटून समजावून सांगण्यासाठी नातेवाईक कुटुंबीय प्रयत्न करत होते. रविवारी सायंकाळी हणबरवाडी येथील पत्नीच्या मामाला लॉजिंगच्या दारात जावयाची गाडी दिसली असता, नातेवाईकांनी युवकाला लॉजमधून बाहेर बोलावले.
संबंधित युवक बाहेर येताच माझा पाठलाग करता काय, तुम्हाला सोडणार नाही, मी कोण आहे ते सांगतो, असे म्हणत शिवीगाळ करत नातेवाईकांना लाथाबुक्क्यांनी, दगडाने मारहाण केली. यावेळी त्या युवकासोबत आलेल्या महिलेनेदेखील मारहाणीत साथ दिली. युवकाने लाकडी बॅटनपट्टी नातेवाईक महिलेच्या डोक्यात मारून जखमी केले. याबाबत नातेवाईकांनी जावयाविरोधात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल पाटील करत आहेत.
दुसऱ्या घटनेची आठवण
आठ ते दहा महिन्यांपूर्वी दिंडनेर्ली ते हणबरवाडी दरम्यान असणाऱ्या एका लॉजिंगच्या दारात बिद्री परिसरातील प्रेमीयुगुलाची मुलीकडच्या नातेवाईकांनी यथेच्छ धुलाई केली होती. पोलिसांत प्रकरण गेले होते, पण शेवटी तडजोडीने परस्पर मिटवले गेले होते.