Kolhapur: भरधाव डंपर काळ बनून आला अन् चिरडून गेला!, अर्जुनवाडचा एकजण ठार; डंपर चालक फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 16:08 IST2023-07-26T16:07:39+5:302023-07-26T16:08:43+5:30
वाहनाचे चाक बदलताना संभाजीपूर येथे अपघात

Kolhapur: भरधाव डंपर काळ बनून आला अन् चिरडून गेला!, अर्जुनवाडचा एकजण ठार; डंपर चालक फरार
शिरोळ : चारचाकीचे पंक्चर झालेले चाक बदलत असताना समोरून भरधाव आलेल्या डंपरच्या धडकेत एकजण ठार झाला. गोरखनाथ आण्णासो गायकवाड (वय ४८, रा. घालवाड रोड, देसाई मळा, अर्जुनवाड) असे मृताचे नाव असून, रामचंद्र नायकू सावंत (२५, रा. शिरोळ) हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची घटना सोमवारी रात्री आठच्या सुमारास संभाजीपूर येथील हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी अज्ञात डंपर चालकाविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गोरखनाथ गायकवाड व त्यांचे नातेवाईक रामचंद्र सावंत हे दोघेजण चारचाकी वाहनातून कोल्हापूरला गेले होते. शिरोळकडे येत असताना शिरोळ बायपास रोडवरील चौंडेश्वर फाट्याजवळ त्यांच्या वाहनाचे चाक पंक्चर झाले. त्यामुळे ते चाक बदलत असताना समोरून आलेला भरधाव डंपर गायकवाड यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले. तर सावंत यांना गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघातानंतर डंपर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात शिरोळ पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.