नवे पारगाव : वाठार-बोरपाडळे राज्यमार्गावरील तळसंदे (ता. हातकणंगले) गावाच्या हद्दीत असलेल्या हॉटेल रेणुकासमोर अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत जखमी झालेल्या तिसऱ्या मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले होते. गुरुवारी (दि.२८) रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. घटनेची नोंद वडगाव पोलिसांत झाली आहे.मृत नरेंद्रकुमार यादव, हेमंत पहाडी व जखमी विनेशकुमार तळसंदे येथील प्लंबिगचे काम आटोपून वाठारमार्गे कराडला (एम. एच. १०- ए.बी-४२२८) मोटारसायकलवरून निघाले होते. रेणुका हॉटेलजवळ आले असता अज्ञात वाहनाने मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात नरेंद्रकुमार यादव, हेमंत पहाडी हे दोघे जागीच ठार झाले. तर विनेशकुमार गंभीर जखमी झाला होता. त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला.रस्त्याची चाळण अन् अपघातात वाढवाठार-बोरपाडळे हा राज्यमार्ग पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग व कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणारा राज्य मार्ग आहे. या राज्यमार्गावर ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. खड्डे चुकविण्यासाठी वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
Kolhapur: तळसंदे येथील अपघातातील जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू, दोघे झाले होते जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:01 IST