कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रासह सीमाभागात ५० हून अधिक घरफोड्या करणारा सराईत चोरटा गुरुदत्त शांतीनाथ पोळ (वय ४३, रा. जवाहरनगर, कोल्हापूर) आणि २२ घरफोडीचे गुन्हे करणारा स्वप्निल सुरेश सातपुते (३९, रा. यादवनगर, कोल्हापूर) या दोघांसह चौघांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून इस्पुर्ली आणि मिरजेतील घरफोड्यांची उकल करून पोलिसांनीचोरीतील साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.टोळीतील हरीश मधुकर पोळ (३८, रा. जवाहरनगर) याच्यासह डॉ. संजय मधुकर पोळ (४७, सध्या रा. सुभाषनगर, मिरज, जि. सांगली, मूळ रा. जवाहरनगर, कोल्हापूर) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. संजय पोळ हा टोळीचा प्रमुख गुरुदत्त याचा भाऊ आहे. त्याचा मिरजेत दवाखाना आहे. वाढत्या घरफोड्यांचे गुन्हे रोखण्यासाठी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांचा शोध घेताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील अंमलदार नवनाथ कदम आणि खंडेराव कोळी यांना संशयित गुरुदत्त पोळ याची माहिती मिळाली.कळंबा येथील कात्यायनी मंदिराजवळ तो चोरीतील दागिने विक्रीसाठी येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला तीन साथीदारांसह अटक केली. अधिक चौकशीत त्याने इस्पुर्ली आणि मिरज येथे घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील साडेतीन तोळे सोन्याचे दागिने, १८६ ग्रॅम चांदीचे दागिने, दोन दुचाकी, दोन मोबाइल, चाकू, कटावणी असे साडेपाच लाखांचे साहित्य जप्त केले.पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक चेतन मसुटगे, उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार शिवानंद स्वामी, दीपक घोरपडे, बालाजी पाटील, अमित सर्जे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, संदीप पाटील, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
सराईत चोरटेपोलिसांच्या अटकेतील चोरटा गुरुदत्त पोळ हा सराईत असून, त्याच्यावर घरफोड्यांचे ५० गुन्हे दाखल आहेत. त्याचा साथीदार सप्निल सातपुते याच्यावरही २२ गुन्हे दाखल आहेत. आठ-नऊ वर्षांपूर्वी या दोघांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणले होते. ते पुन्हा सक्रिय झाल्याने अधिक चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
डॉक्टर, गवंडी, भंगार व्यावसायिकांची टोळीटोळीचा प्रमुख गुरुदत्त पोळ हा गेल्या काही वर्षांपासून भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा मोठा भाऊ संजय पोळ हा पेशाने डॉक्टर असून, मिरजेत त्याचा दवाखाना आहे. हरीश पोळ हा गवंडी काम करतो, तर संजय पोळ हा मिळेल ते काम करीत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.