कोल्हापूर विमानतळासाठी २९० कोटी रुपयांचा निधी, २.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:19 IST2025-11-19T17:19:04+5:302025-11-19T17:19:58+5:30
विस्तारीकरणांतर्गत धावपट्टीची वाढ करण्यात येणार

कोल्हापूर विमानतळासाठी २९० कोटी रुपयांचा निधी, २.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार
कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळाच्या विकास व विस्तारीकरणासाठी २९० कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास राज्य सरकारने सोमवारी सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली. या निधीतून विमानतळासाठी भूसंपादन व कोल्हापूर-हुपरी या राज्यमार्गाच्या वळतीकरण करण्यासाठी २.६० हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याचा अध्यादेश काढला.
कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत धावपट्टीची वाढ करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन करणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने सुरुवातीला २७४ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. तो मंजूर होऊन भूसंपादनासाठी काही निधी देण्यात आला होता. भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाकडून अंदाजे रक्कम कळवण्यात आली होती. परंतु, प्रत्यक्षात जमीन संपादन करतेवेळी जास्तीचा निधी लागला आहे.
प्रत्यक्षात संयुक्त मोजणीअंती २६.६५.५७३५ हेक्टर आर. इतकी जमीन संपादित करायची आहे शिवाय कोल्हापूर-हुपरी या राज्यमार्गाचे वळतीकरण करण्यासाठी ३.६० हेक्टर आर. जमीन संपादित करुन त्या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करायचे असल्याने या कामासाठी २९० कोटी २३ लाख रुपयांच्या खर्चास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने राज्य सरकारला पाठवला होता. त्यानुसार राज्य सरकारने या खर्चाच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे.