kolhapur news: महाविद्यालयीन तरुणीचा कारनामा, गर्दीचा फायदा घेत बसमध्ये करायची चोऱ्या; पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:06 IST2023-01-19T16:05:45+5:302023-01-19T16:06:46+5:30
तिच्याकडून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

kolhapur news: महाविद्यालयीन तरुणीचा कारनामा, गर्दीचा फायदा घेत बसमध्ये करायची चोऱ्या; पोलिसांनी केली अटक
उद्धव गोडसे
कोल्हापूर : बसमध्ये चढणा-या प्रवाशांच्या गर्दीत शिरून महिलांच्या पर्समधील दागिने आणि रोख रक्कम लंपास करणा-या एका महाविद्यालयीन तरुणीस लक्ष्मीपुरी पोलिसांनी काल, बुधवारी (दि. १८) अटक केली. प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा दगडू निंबाळकर (वय २२, मूळ रा. बोरीवडे, ता. पन्हाळा, सध्या रा. बोंद्रेनगर, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे.
लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सहा गुन्हे केल्याची तिने कबुली दिली आहे. यापूर्वी मुंबई आणि पुण्यातही तिने चोरीचे गुन्हे केले आहेत. पोलिसांनी तिच्याकडून चोरीतील दागिने आणि रोकड असा एक लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून शहरात केएमटी बसमध्ये चढताना पर्सचोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांची संशयितांवर नजर होती. छत्रपती शिवाजी चौकातील बस स्टॉपवर संशयास्पद हालचाली करणारी प्रज्ञा उर्फ प्रतीक्षा निंबाळकर या तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, तिने पर्सचोरीची कबुली दिली.
पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड, पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांच्यासह रणजीत देसाई, रोहित मर्दाने, प्रतीक शिंदे, संजय कोळी, सुहास पाटील, संदीप कुंभार, वृंदा इनामदार, अश्विनी अतिग्रे आदींनी ही कारवाई केली. अटकेतील तरुणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत चोरटी असून, तिच्याकडून चोरीचे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड यांनी व्यक्त केली आहे.