११२ कोटी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष, कोल्हापुरातील पूजा भोसलेवर पुण्यात आणखी एक गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 12:18 IST2025-10-14T12:15:51+5:302025-10-14T12:18:19+5:30
पूजा भोसले ही मे २०२३ पासून पसार आहे

११२ कोटी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष, कोल्हापुरातील पूजा भोसलेवर पुण्यात आणखी एक गुन्हा
कोल्हापूर : निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टच्या नावे गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारी पूजा अजित भोसले-जोशी (सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे, मूळ रा. राजारामपुरी, कोल्हापूर) हिच्यावर पुण्यात भोसरी पोलिस ठाण्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. तिच्या नावे असलेल्या रकमेतील ११२ कोटी रुपये दहा वर्षांसाठी फिक्स डिपॉझिट देण्याचे आमिष दाखवून सहा जणांनी ही फसवणूक केल्याचा उल्लेख फिर्यादीत केला आहे. पूजा भोसले ही मे २०२३ पासून पसार आहे.
निवारा टेस्टामेंटरी ट्रस्टकडून २५ लाखांचा धनादेश देण्याचे आमिष दाखवून पूजा भोसले आणि तिच्या सहकाऱ्यांनी शेकडो लोकांकडून प्रत्येकी साडेचार हजारांचे नोंदणी शुल्क भरून घेतले होते. ही फसवणूक लोकमतने उघडकीस आणताच तिच्यासह अन्य सहकाऱ्यांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अटकेच्या भीतीने मे २०२३ पासून ती पसार झाली.
मात्र, पुण्यात राहून तिने आणखी काही लोकांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. आपल्या नावे बँकेत वडिलांनी कोट्यवधी रुपयांची ठेव ठेवली आहे. यातील काही रक्कम ५० लोकांच्या नावे फिक्स डिपॉझिट केली जाणार आहे. फिक्स डिपॉझिट घेण्यासाठी आयकराचे ३ कोटी रुपये भरावे लागतील, असे सांगून सहा जणांच्या टोळीने फिर्यादी दत्तात्रय नामदेव येळवंडे (वय ५९, रा. भोसरे, पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्याकडून दोन कोटी ६५ लाख रुपये उकळले आहेत. या गुन्ह्याचा तपास भोसरी पोलिसांकडून सुरू आहे.
सहा जणांवर गुन्हा
याप्रकरणी अजय राजाराम खडके, स्वामीनाथन जाधव, ॲड. सोमनाथ कदम, सतेंद्र विष्णुपंत मोडक, ओंकार बजरंग जावीर आणि पूजा अजित भोसले-जोशी (सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यातील पूजा भोसले-जोशी हिला गोव्यातून अटक केल्याची माहिती मिळत आहे.