Kolhapur: ‘सीडीएम’मध्ये बनावट नोटा भरल्या, गडहिंग्लजच्या एकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 17:52 IST2025-06-20T17:51:19+5:302025-06-20T17:52:21+5:30
फसवणुकीची बँकेची तक्रार : ५०० च्या ३५ नोटा बनावट

Kolhapur: ‘सीडीएम’मध्ये बनावट नोटा भरल्या, गडहिंग्लजच्या एकावर गुन्हा
गडहिंग्लज : ‘सीडीएम’मध्ये १७५०० रुपयांच्या बनावट नोटा भरून बहुराष्ट्रीय बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आकाश रवींद्र रिंगणे (रा. खोत गल्ली, नदीवेस, गडहिंग्लज) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गडहिंग्लज-चंदगड राज्यमार्गावरील एका खासगी व्यापारी संकुलात ‘या’ बँकेची शाखा आहे. बँकेच्या प्रवेशद्वारालगतच ग्राहकांच्या सोयीसाठी पैसे भरणे व काढण्याचे मशीन (सीडीएम) बसवण्यात आले आहे. मंगळवारी (१७) रात्री ११:४५ वाजता आकाशने बँकेतील आपल्या खात्यावर पाचशे रुपयांच्या ३५ नोटा मिळून एकूण १७५०० रुपये भरले होते.
दरम्यान, गुरुवारी (१९) एटीएममध्ये पैसे भरणाऱ्या कॅश मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी एटीएममधील पैसे काढल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले.
बँकेचे उपशाखाधिकारी गौरव खरबुडे यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक अजय सिंदकर अधिक तपास करीत आहेत.
नोटा मध्यरात्री भरल्या
मंगळवारी (१७) रात्री पावणे बाराच्या सुमारास आकाशने आपल्या खात्यावर पाचशेच्या ३५ नोटा भरल्या होत्या. त्यामध्ये ‘९ आरके ७७८६१६ या क्रमांकाच्या ४, ९ आरके ७४५११७ या क्रमांकाच्या ८ नोटा, ९ आरके ७४५११८ या क्रमांकाच्या ८ नोटा, ९ आरके ३०५२१९ या क्रमांकाच्या १२ नोटा, ९ आरके ३०५२१५ या क्रमांकाची १ नोट, ९ आरके ७४५१२२ या क्रमांकाची १ तर ९ आरके ७७८६७८ या क्रमांकाची १ या नोटांचा समावेश आहे. त्यांची एकूण किंमत १७५०० आहे.
संशयास्पद नोटा बाजूला
मशीनमध्ये पैसे भरल्यानंतर त्या सर्व नोटा ‘मशीन’मधील संशयित नोटांच्या ट्रे मध्ये जाऊन पडल्या होत्या. ‘सीएमएस’च्या कर्मचाऱ्यांकडून मिळाल्यानंतर बँकेच्या कॅशिअरनीही मशीनवर पडताळणी केली. त्यात त्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले. आकाशचा खातेक्रमांक, खात्यावर पैसे भरल्याची वेळ व सीसीटीव्ही फुटेजवरून खात्री झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे वरिष्ठांच्या सूचनेनुसार संशयिताविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली.