Kolhapur: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, इचलकरंजीच्या डॉक्टरला ९३ लाखांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 12:13 IST2024-12-23T12:12:49+5:302024-12-23T12:13:43+5:30

इचलकरंजी : शेअर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याबरोबरच नफ्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक ...

93 lakh defrauded of a doctor by giving the lure of profit along with getting excess returns from share investment | Kolhapur: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, इचलकरंजीच्या डॉक्टरला ९३ लाखांना गंडा

Kolhapur: शेअर मार्केटमधून जादा परताव्याचे आमिष, इचलकरंजीच्या डॉक्टरला ९३ लाखांना गंडा

इचलकरंजी : शेअर गुंतवणुकीतून जादा परतावा मिळवून देण्याबरोबरच नफ्याचे आमिष दाखवून एका डॉक्टरची ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी ॲक्सिस स्टॉक एक्स्चेंज कंपनी कस्टमर केअर, केर्सी तावडिया व असिस्टंट राशी अरोरा या तिघांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत डॉ. दशावतार गोपाळकृष्ण बडे (वय ५६, रा. गुलगुंजे गल्ली, जवाहरनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, डॉ. बडे हे वैद्यकीय व्यवसाय करतात. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात बडे यांना इन्स्ट्राग्रामवरून माहिती मिळाली. इन्स्ट्राग्रामवरील गुंतवणुकीची लिंक त्यांनी डाउनलोड करून घेतली. त्यानंतर त्यांनी संबंधित व्यक्तींसोबत व्हॉटस्ॲप ग्रुपवरून संदेशाची देवाणघेवाण झाली. १५०० रुपयांप्रमाणे पाच वेळा त्यांनी रक्कमही गुंतवली. त्यानंतर त्यांचे शेअर मार्केटसंदर्भातील खाते उघडले गेले. त्या खात्यावर काही रक्कमही त्यांनी गुंतवली. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावरील नफ्याची रक्कम वाढत गेली.

दरम्यान, संशयित आरोपींनी बडे यांचा विश्वास संपादन केला. आयपीओमध्ये गुंतवणूक करावी. ९१ ते २५१ टक्के लाभ मिळवून देऊ, असे आमिष त्यांनी दाखवले. त्याप्रमाणे डॉ. बडे यांनी १३ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२४ या कालावधीत वेगवेगळ्या खात्यात ९३ लाख ३५ हजार रुपये भरले. त्यानंतर त्यांच्या शेअर मार्केटच्या खात्यावर चार कोटी रुपये जमा झाल्याचे दिसले. ही रक्कम काढता येते का, अशी विचारणा डॉ. बडे यांनी वेळोवेळी केली. रक्कम काढायची असेल, तर पुन्हा ६५ लाख रुपये भरावे लागतील, असे त्यांना सांगण्यात आले. यावरून बडे यांना संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

डॉ. बडे यांनी कंपनीच्या व्हॉटस्ॲपग्रुपच्या ॲडमिनसह तिघांनी संगनमताने ९३ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन पाटील करीत आहेत.

सायबरकडून माहिती घेणे सुरू

फसवणूक केलेली रक्कम मोठी आहे. ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याने सायबर विभागाकडून संबंधित कंपनीची माहिती घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतरच संबंधित कंपनी, संशयित आरोपी कुठले आहेत, हे समजणार आहे.

दोन महिन्यांत तिसरा प्रकार

दोन महिन्यांपूर्वी शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर ज्यादा परताव्याची आमिष दाखवत बनावट ॲपद्वारे कबनूर (ता.हातकणंगले) येथील एकाची ४९ लाख रुपयांची फसणूक झाल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर एका बाप-लेकाला कार खरेदी आणि जागा खरेदी यामध्येही फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. त्या पाठोपाठ डॉक्टरची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

Web Title: 93 lakh defrauded of a doctor by giving the lure of profit along with getting excess returns from share investment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.