Kolhapur- बाळूमामाच्या खजिन्यावर डल्ला: जमीन खरेदी व्यवहारात पावणे आठ कोटींचा ढपला

By इंदुमती सूर्यवंशी | Published: October 31, 2023 12:18 PM2023-10-31T12:18:58+5:302023-10-31T12:19:19+5:30

लेखापरीक्षणात ओढले गंभीर ताशेरे : रक्कम बाळूमामांची, दुसऱ्याच कंपनीच्या खात्यावर वर्ग

7 crore scam in the purchase of land adjacent to Sri Balumama temple in Adamapur kolhapur | Kolhapur- बाळूमामाच्या खजिन्यावर डल्ला: जमीन खरेदी व्यवहारात पावणे आठ कोटींचा ढपला

काही वर्षांपूर्वी नव्याने बांधलेल्या देवालयातील संगमरवरी दगड असे काळे पडले

इंदुमती गणेश

कोल्हापूर : आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिराला लागून असलेल्या जमिनीच्या खरेदी व्यवहारात ७ कोटी ७३ लाख १५ हजारांचा ढपला पाडण्यात आला आहे. शासकीय मूल्यांकनानुसार बाजारभावाप्रमाणे या मिळकतीची ७४ लाख ५० हजारांना खरेदी झाल्यानंतर तीन महिन्यांनी रकमेच्या नोंदीत चूक झाल्याचे दाखवून हे पावणे आठ कोटी रुपये महाराष्ट्र इंजिनिअर्स मुंबई यांच्या नावाने आरटीजीएस केले आहेत. रक्कम देवालयाची, जमीन विकणारा दुसरा आणि रक्कम खात्यावर वर्ग झालेली कंपनी तिसरीच असा हा व्यवहार झाला असून धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने यामुळे देवस्थानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे ताशेरे ओढले आहेत. लेखापरीक्षकांनीदेखील असेच शेरे मारले आहेत.

बाळूमामांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी भक्तनिवास, अन्नछत्र, पार्किंगच्या सोयी करण्यासाठी मंदिराला लागून असलेल्या दिनकर संतू कांबळे यांची गट नंबर २७९ मधील एक एकर शेतजमीन ८ डिसेंबर २०२० रोजी २५ लाख २५ हजारांना व गट नंबर ३२५ मधील २ एकर १५ गुंठे क्षेत्र ७४ लाख ५० हजारांना खरेदी केली. त्याची पूर्ण रक्कम मालकांना अदा झाली. त्यानंतर तीन महिन्यांनी दिवंगत कार्याध्यक्षांनी २२ मार्च २०२१ रोजी गट नंबर ३२५ मधील त्याच जागेची किंमत ८ कोटी ४७ लाख ६५ इतकी दाखवून उरलेली ७ कोटी ७३ लाखांची एवढी मोठी रक्कम महाराष्ट्र इंजिनिअर्स मुंबई या कंपनीच्या नावे आरटीजीएस केली आहे.

याबाबत दिलेल्या लेखी जबाबात कार्याध्यक्षांनी मोबदल्याची रक्कम अनावधानाने चुकली व ही बाब मालकांनी निदर्शनाला आणून दिल्यावर पुरवणी खरेदी केल्याचे म्हटले आहे. मात्र धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने केलेल्या चौकशी अहवालात पूर्वीचे दोन्ही मिळकत खरेदी दस्त शासकीय मूल्यांकनानुसार व बाजारभावाने झाल्याचे म्हटले आहे. त्याचे स्पष्टीकरण व्यवहार करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडे नाही.

जमिनी, वाहने स्वत:च्या नावावर

ट्रस्टच्या पैशातून कार्याध्यक्षांसह विश्वस्त अशा पदांऐवजी व ट्रस्टच्या नावाऐवजी वैयक्तिक नावे जमिनी व वाहनांची खरेदी झाली आहे. खरेदी केलेल्या जागांचा नकाशा, मोजणी झालेली नाही. अनेक जागांच्या मालकी नोंदणीची प्रक्रिया अपूर्ण आहे, स्थावर मालमत्ता नोंदवही नाही. मागील दहा वर्षात दोन बोलेरो, दोन स्कॉर्पिओ, झायलो, टाटा एरीया, इनोव्हा, ट्रॅक्टर अशा अनेक वाहनांची खरेदी व नादुरुस्तीची कारणे सांगून परस्पर विक्री झाली आहे. ही वाहने घेतलीत किती रकमेला आणि विकली किती रकमेला याच्याही कुठेच नोंदी नाहीत. स्वत:ची खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे सगळा व्यवहार झाला आहे.

लेखापरीक्षणातील ताशेरे

ट्रस्टच्या स्थावर व जंगम मालमत्तांचे रजिस्टर योग्य पद्धतीने नाही, मिळकतीतील बदल अधिकाऱ्यांना कळविलेले नाही, पूर्वीच्या लेखापरीक्षण अहवालातील दोष व उणिवा दूर केलेल्या नाहीत. दुरुस्ती, बांधकामासाठी निविदा काढलेल्या नाही असे ताशेरे लेखापरीक्षण अहवालात मारले आहेत.

दहा वर्षातील व्यवहाराच्या लेखापरीक्षणाची मागणी

ट्रस्टमध्ये झालेल्या या गैरव्यवहार व भ्रष्टाचारावर ताशेरे मारत चौकशी अधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या मागील दहा वर्षातील सर्व कारभाराच्या शासकीय लेखापरीक्षणाची मागणी केली आहे. तसेच ज्या कामांसाठी कोट्यवधींच्या रकमा वापरल्या गेल्या ती कामे प्रत्यक्षात आहेत का याची पडताळणी व्हावी असे म्हटले आहे.

Web Title: 7 crore scam in the purchase of land adjacent to Sri Balumama temple in Adamapur kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.