कोल्हापूरच्या सहायक फौजदाराने मागितली ६५ लाखांची खंडणी, मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी मागणी

By उद्धव गोडसे | Updated: September 30, 2025 15:44 IST2025-09-30T15:44:10+5:302025-09-30T15:44:28+5:30

कोल्हापुरातील पोलिसासह पाच जणांवर गुन्हा, अकलूज पोलिसांची माहिती

65 lakh ransom demanded to cancel MOKKA's action against 13 Sarait criminals in Akluj Crime registered against five people from Hubri including an assistant police officer from Kolhapur | कोल्हापूरच्या सहायक फौजदाराने मागितली ६५ लाखांची खंडणी, मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी मागणी

कोल्हापूरच्या सहायक फौजदाराने मागितली ६५ लाखांची खंडणी, मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी मागणी

उद्धव गोडसे

कोल्हापूर : अकलूज (जि. सोलापूर) येथील १३ सराईत गुन्हेगारांवरील मोक्काची कारवाई रद्द करण्यासाठी ६५ लाखांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांवर अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात कोल्हापूरपोलिस मुख्यालयातील एका सहायक फौजदारासह हुपरीतील एका तरुणाचा समावेश आहे. कारवाईची कुणकुण लागताच संबंधित पोलिस रजा टाकून पसार झाल्याने या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या पोलिस दलात सुरू आहे.

अकलूज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अकलूज परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडे पाठवला होता. ती कारवाई रद्द होऊ शकते. यासाठी ६५ लाख रुपये द्यावे लागतील, असा फोन समीर नावाच्या व्यक्तीने अकलूजमधील प्रदीप चंद्रकांत माने (वय २५) याला केला होता.

याबाबत माने याने दिलेल्या फिर्यादीचा तपास करताना अकलूज पोलिसांनी समीर याच्यासह आणखी चार संशयितांची नावे निष्पन्न केली. यात कोल्हापूर मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे याचे नाव समोर आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यातील त्याच्या सहभागाची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे अकलूज पोलिसांनी सांगितले. दरम्यान, अटकेच्या भीतीने नलावडे हा वैद्यकीय रजा टाकून गायब झाल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल

समीर अब्बास पानारी (३५, रा. महावीरनगर, हुपरी, ता. हातकणंगले), सतीश रामदास सावंत (५०, रा. उपळाई बुद्रुक, ता. माढा, जि. सोलापूर), सहायक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे (पोलिस मुख्यालय, कोल्हापूर), कमलेश रमेश कानडे (रा. लालबाग, मुंबई) आणि लाला उर्फ लालासाहेब ज्ञानेश्वर अडगळे (रा. अकलूज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील गुन्ह्यात मुख्यालयातील एका पोलिसाचा सहभाग असल्याची आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, अजून याची लेखी माहिती आलेली नाही. लेखी माहिती मिळताच संबंधित पोलिसावर कारवाई केली जाईल. - योगेश कुमार - पोलिस अधीक्षक

Web Title: 65 lakh ransom demanded to cancel MOKKA's action against 13 Sarait criminals in Akluj Crime registered against five people from Hubri including an assistant police officer from Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.