Kolhapur flood: एसटीच्या ६० फेऱ्या रद्द, ४० मार्गावरील वाहतूक बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:49 IST2025-08-21T13:43:26+5:302025-08-21T13:49:34+5:30
कोल्हा पूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बंधारा, ओढे नाल्यावर आणि नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीच्या ६० फेऱ्या रद्द केल्या आहेत. ...

Kolhapur flood: एसटीच्या ६० फेऱ्या रद्द, ४० मार्गावरील वाहतूक बंद
कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बंधारा, ओढे नाल्यावर आणि नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने एसटीच्या ६० फेऱ्या रद्द केल्या आहेत. कोल्हापूर विभागाचे ५ हजार ५७४ किलोमीटरचा प्रवास थांबला असून १ लाख ५६ हजार १६५ रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पाणी आल्याने ४० मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे. पावसाची परिस्थिती पाहून मार्गावर एसटी सोडण्यात येत आहेत. केर्ली मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करण्याचे नियोजन एसटी प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
कोल्हापूर-राधानगरी मार्ग बंद
सडोली (खालसा) : जिल्ह्यासह करवीर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे हळदी (ता. करवीर) येथील बाजारपेठेत भोगावती नदीचे पाणी शिरल्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले आहे. कोल्हापूर-राधानगरी महामार्गावर हळदी गावाजवळ पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे आतापर्यंत आठ कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग बंद
पोर्ले तर्फ ठाणे : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील केर्ली ते हनुमाननगर (ता.करवीर) दरम्यानच्या रस्त्यावर कासारी नदीच्या पुराची पाणीपातळी चार फुटांनी वाढल्यामुळे प्रशासनाने संभाव्य धोका ओळखून वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे. या रस्त्याला पर्यायी वाहतूक म्हणून केर्लीमार्ग, जोतिबा, दाणेवाडी, वाघबीळ या मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली आहे.
बावडा-शिये मार्ग वाहतुकीसाठी बंद
मुसळधार पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर केर्ले ते केर्ली दरम्यान पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरालगत बावडा-शिये मार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. रात्री १० वाजता पंचगंगा नदी ४१.१० फुटांपर्यंत पोहोचली असून, नदीचे पाणी धोका पातळीकडे सरकत आहे.
शिरोली येथे सेवा मार्गावर पाणी आले
शिरोली : शिरोली, ता. हातकणंगले येथे पुणे–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या पश्चिम भागातील सेवा मार्गावर अडीच फूट पाणी आले आहे. यामुळे रात्री शिरोली पोलिसांनी या सेवा मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. या परिस्थितीमुळे सेवा मार्गावरील सर्व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
कागल-मुरगुड राज्यमार्ग सिद्धनेर्ली जवळ बंद
सिद्धनेर्ली : कागल-मुरगुड राज्य मार्गावरील नदी किनारा सिद्धनेर्ली येथे दुधगंगा नदी पुलावर पाणी आल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सायंकाळी सातनंतर पुलावर एक फूट पाणी आल्याने व पाणी पातळी वाढतच असल्याने हा रस्ता बॅरिकेड लावून बंद करण्यात आला. तसेच सिद्धनेर्ली-एकोंडी मार्गही बंद केला आहे.
शित्तूर-आरळा पूल पाण्याखाली, सोळा गावांचा संपर्क तुटला
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यासह परिसरात मुसळधार पावसामुळे सोंडोली आणि शिराळा तालुक्यांतील चरण गावांना जोडणारा मालेवाडी–सोंडोली पूल पाण्याखाली गेला आहे. शित्तूर–आरळा हा पूलही पाण्याखाली गेल्याने तब्बल सोळा गावांचा संपर्क तुटला आहे. वारणा नदीला पूर आल्यामुळे गावांना पुराचा वेढा बसला आहे. कडवी, कासारी, वारणा नदीवरील चौदा बंधारे पाण्याखाली आहेत. सोंडोली गावात जवळपास १५ घरांत पाणी शिरले असून जनावरांच्या गोठ्यांमध्येही पाणी शिरले आहे. बाधित कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलविले असून ग्रामपंचायतीकडून गावातील शाळेत त्यांची तात्पुरती सोय केली आहे.
आजऱ्यात सात बंधारे पाण्याखाली
आजरा : आजरा तालुक्यात पडणाऱ्या संततधार पावसाने तालुक्यातील सहा बंधाऱ्यात पाणी आले आहे. पावसाने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील साळगाव, किटवडे, दाभिल, आंबाडे, परोलीवाडी, सरोळी, शेळप हे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधाऱ्यावर पाणी आल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.
सावर्डे-कांदे बंधारा पाण्याखाली, वाहतूक बंद
वारणानगर : वारणा नदीवरील बच्चे सावर्डे-मांगले व सावर्डे-कांदे हे दोन मार्ग कोल्हापूर- सांगली जिल्ह्यांना जोडणारे असून दोन्ही बंधारे मंगळवारी दुपारी पाण्याखाली गेले आहेत, त्यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी दोन्ही जिल्ह्यातील वाहतूक बंद झालेली आहे. हा बंधारा पाण्याखाली गेल्याने किमान पाच ते सात किलोमीटर लांब पल्ल्याच्या मार्गाने नागरिकांना ये-जा करावी लागणार आहे.
आगार/रद्द झालेल्या फेऱ्या
- कोल्हापूर : चिपळूण फेरी रद्द (हेळवाक धरण येथे पाणी आल्याने)
- संभाजीनगर : धानवडे, कोदे, गावडी, भोगाव, तळगाव, मारुती धनगरवाडा बावेली
- इचलकरंजी : काही नाही
- गडहिंग्लज : नेसरी, बुगडी कट्टी, हनुमंतवाडी, बसर्गे, हलकर्णी, आजरा
- गारगोटी : मुरगुड, कापशी, निपाणी, पंढरपूर
- मलकापूर : धोपेश्वर, परकंदळे, कोल्हापूर
- चंदगड : कोल्हापूर, सांगली
- कुरुंदवाड : काही नाही
- कागल : मुरगुड, म्हाकवे, वाळवा
- राधानगरी : पुणे, निपाणी, वाशी सावर्डे, शिरगाव, कौलव, दाजीपूर
- गगनबावडा : पंढरपूर, सातारा
- आजरा : किटवडे येथे पाणी आल्याने अंशत: फेऱ्या रद्द