कोल्हापूर जि.प'च्या ५७ कोटींच्या कटात वित्त मधील खबऱ्या; पोलिसांकडून संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 12:18 IST2025-02-26T12:17:20+5:302025-02-26T12:18:29+5:30
मोठ्या रकमेचे खाते नंबर, धनादेशाचा नंबर बाहेर

कोल्हापूर जि.प'च्या ५७ कोटींच्या कटात वित्त मधील खबऱ्या; पोलिसांकडून संशय
कोल्हापूर : कोट्यवधी रूपयांची खाती आणि मूळ धनादेशावरील क्रमांक बनावटगिरीसाठी वापरल्यामुळे ५७ कोटी ४ लाख रूपये हडप करण्याच्या डावात जिल्हा परिषद वित्त विभागातील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतील खबऱ्या कर्मचारी असल्याचा संशय पोलिसांना प्रथमदर्शनी आला आहे.
कोणत्याही बँकेत त्रयस्थाला कोणत्या खात्यात किती रक्कम आहे, धनादेशाचा क्रमांक किती आहे, हे सांगितले जात नाही; पण या प्रकरणात जिल्हा परिषदेकडील कोट्यवधी रुपयांचे खाते नंबर आणि धनादेशाचे क्रमांक फसवणूक करणाऱ्याकडे गेले आहेत. म्हणून पोलिसांना हा संशय आला आहे.
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहारातील घोटाळ्यानंतर आता वित्त विभागाच्या बनावट सहीने बनावट धनादेश तयार करून परस्पर रक्कम वर्ग करण्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा बँकेच्या जिल्हा परिषद शाखेतून जिल्हा परिषदेचा निधी परस्पर लाटण्याचा नियोजनबध्द कट रचला होता.
मंगळवारी पहिल्या टप्प्यात १८ कोटी ४ लाख ३० हजारांची रक्कम वर्ग केल्यानंतर बुधवारी शासकीय सुट्टी होती. त्यामुळे हे पैसे खपवण्यात यश येईल, असे अज्ञातांना वाटले होते; पण जिल्हा परिषदेच्या ज्या खात्यावरील धनादेश कोणत्याही कारणासाठी दिला जात नाही, त्याच खात्यावरून पैसे वजा झाल्याने वरिष्ठांनी तातडीने सूत्र हलवली. हा सर्व प्रकार उघड होऊन तब्बल ५७ कोटींवरील रकमेवरील डल्ला मारण्याचा कट उधळला आहे.
बनावट धनादेश
जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा बँकेच्या शाखेत जावून आपल्या खात्यावरील व्यवहाराची माहिती घेतली. त्यावेळी त्यात वटवलेले तिन्ही धनादेश आणि जिल्हा परिषदेकडील धनादेश यामध्ये तफावत दिसून आली. यावरून जिल्हा परिषदेची रक्कम परस्पर हडप करण्यासाठी बनावट धनादेश तयार केल्याचे उघड झाले.
बनावटगिरीसाठी काय केले ?
- जिल्हा बॅंकेचे धनादेशावरील खातेनंबरचे शेवटचे सात अंकी हे स्टॅपिंग असतात. बनावट वटलेल्या तिन्ही धनादेशावरील खातेनंबर छापील आहेत.
- बँकेच्या धनादेशात दिनांकच्या खाली ‘या धारक को ऑर बेरर किंवा ऑर ऑर्डर असे असते. मात्र बनावट धनादेशात असे नाही.
- वित्त विभागाकडील दिलेल्या प्रत्येक धनादेशावर शिक्का मारला जातो. बनावट धनादेशावर इंग्रजी अक्षर रचना चुकीची दिसून येते.
- जिल्हा परिषदेचा पत्ता आणि बनावट धनादेशातील पत्त्यात फरक आहे.
- बनावट धनादेशावरील रकमेचा व शिक्क्यातील स्पेलिंग चुकीचे आहे.
- धनादेशावरील अधिकाऱ्याच्या नावात तफावत आहे.