कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात, आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 15:28 IST2025-11-22T15:27:30+5:302025-11-22T15:28:38+5:30
Local Body Election: माघारीनंतर चित्र स्पष्ट : बुधवारी चिन्ह वाटप

कोल्हापूर जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी ५६ तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार रिंगणात, आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतीच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी नगराध्यक्षपदासाठी ५६ इतके तर सदस्यपदासाठी ८०९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. माघारीनंतर नेमक्या लढतीचे चित्र झाल्याने आता प्रचाराला वेग येणार आहे. तर काही ठिकाणी पक्षीय पातळीवरच्या प्रचारसभादेखील सुरू झाल्या आहेत. बुधवारी अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. २ डिसेंबरला मतदान ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली असून निवडणुकीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या माघारीसाठी शुक्रवारपर्यंतची अंतिम मुदत होती. माघारीनंतर नेमक्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. अध्यक्षपदासाठीच्या रिंगणातून ३७ जणांनी तर सदस्य पदासाठीच्या रिंगणातून ३३४ जणांनी माघार घेतली. त्यामुळे ज्या उमेदवारांचे वैध-अवैध प्रकरण नाही त्या उमेदवारांचा प्रचाराचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे गावागावांमध्ये आजपासून प्रचाराचे पडघम वाजणार आहेत.
ज्यांचे अर्ज अपिलात आहेत त्यांना मात्र २५ तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यादिवशी निकाल लागल्यानंतरही अपिलातील उमेदवारांना अर्ज माघारी घेता येतो. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची अंतिम आकडेवारी त्याचदिवशी कळेल. २६ तारखेला अपक्षांना चिन्ह वाटप होणार आहे. त्यानंतर प्रचारासाठी पुढे चार दिवस मिळतात.