Kolhapur: खोटा नकाशा वापरून बँकेची ४४ लाखांची फसवणूक, ग्रामसेवकास अटक; आतापर्यंत तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 13:36 IST2024-02-22T13:35:26+5:302024-02-22T13:36:41+5:30
चौघेजण अद्याप फरारच

Kolhapur: खोटा नकाशा वापरून बँकेची ४४ लाखांची फसवणूक, ग्रामसेवकास अटक; आतापर्यंत तिघांना अटक
चंदगड : खोटा नकाशा वापरून बँकेची ४४ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवकास अटक केली. गडहिंग्लज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत तिघांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून आणखीन चौघेजण फरार आहेत.
परशराम सुतार सध्या (रा. नेसरी, ता. गडहिंग्लज) या ग्रामसेवकाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात कर्ज मंजुरीसाठी दिलेली कागदपत्रे आरोपींनी आपापसात संगनमत करून २१ ऑक्टोबर २०१६ रोजी मुगळी-सोनारवाडी येथील तत्कालीन ग्रामसेवकाने गट नंबर १५१ मध्येच काजू फॅक्टरी मिळकत क्रमांक ३०८ असल्याचा खोटा दाखला तयार केला. त्याच्या पाठीमागे खोटा चतु:सीमा नकाशा तयार करून तो खरा दाखवून गडहिंग्लज येथील वारणा बँकेच्या शाखेतून ४४ लाख ३७ हजार १६ रुपयांची उचल करून बँकेची फसवणूक केली आहे.
त्यामध्ये दोषी असलेल्या दत्तात्रय विठोबा नाईक, शिवाजी मारुती रेडेकर यांना यापूर्वीच अटक झाली असून तुकाराम बापू रेडेकर, सदानंद विठोबा नाईक, सागर दत्तात्रय नाईक, प्रदीप गंगाधर करबंळी यांच्यावरही गुन्हा दाखल असून ते फरार आहेत. बुधवारी याप्रकरणी ग्रामसेवकाला अटक केली असून त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अली मुल्ला तपास करत आहेत.