घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर!, ५ ब्रासपर्यंत मिळणार मोफत वाळू; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी.. जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 12:32 IST2025-06-03T12:32:11+5:302025-06-03T12:32:46+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय कालबद्ध कार्यक्रम राबविणार

42 thousand beneficiaries in Kolhapur district will get free sand up to 5 brass | घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर!, ५ ब्रासपर्यंत मिळणार मोफत वाळू; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी.. जाणून घ्या

घरकुल लाभार्थ्यांसाठी खुशखबर!, ५ ब्रासपर्यंत मिळणार मोफत वाळू; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी.. जाणून घ्या

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ४१ हजार ४२८ जणांना मिळणार आहे. पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबविणार आहे.

घरकुल आवास योजनेच्या एकूण ६१५ लाभार्थ्यांपैकी ५०८ लाभर्थ्यांना २५४३.०४ ब्रास इतक्या वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे. उर्वरित १२७ लाभार्थ्यांना ४२५ ब्रास वाळू वितरित करण्यात येणार आहे. इचलकरंजी येथील कट्टीमळा जॅकवेलपासून ते इचलकरंजी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत असणाऱ्या तालुकास्तरीय संनियंत्रण समितीने शिफारस केलेल्या गट नं. २७४, २७३, २७१, २५६, २५५, परिमाण ८८२५ ब्रास असे एकूण १० गटांतील एकत्रित २०,८२५ ब्रास इतक्या अंदाजित परिमाणामध्ये गाळ व गाळमिश्रित वाळूउपसा करण्याबाबत १६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या वाळू निर्गती धोरणानुसार कार्यवाही करण्यास मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव सादर केला आहे. याबाबत पंचगंगा नदीचे खोलीकरण करण्यासाठी जलसंपदा विभागाने निर्देश दिले आहेत.

कोल्हापूर जिल्हा गौणखनिज विभागाचे अधिकारी तसेच पाटबंधारे कार्यालय यांच्या समन्वयातून या लाभार्थ्यांना ही वाळू मोफत मिळणार आहे. दिनांक ८ एप्रिल २०२५ रोजीच्या सुधारित वाळू निर्गती धोरणानुसार आणि दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णय आणि भारत सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या दिनांक २८ मार्च २०२० च्या अधिसूचनेनुसार पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक नसलेल्या प्रकरणांची तत्काळ निश्चिती करण्यात येणार आहे. यासाठी आठवडाभरात मोहीम सुरू होणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनाही या कामावर नियंत्रण ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. यामुळे घरकुल लाभार्थ्यांना वेळेत आणि अडथळ्याविना वाळूचा पुरवठा होणार आहे.

कोल्हापूर जिल्हा मॉडेल बनवणार

या मोहिमेतून कोल्हापूर जिल्ह्याला मॉडेल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी येत्या आठ दिवसांत उद्दिष्ट ठेवून एक कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

  • ग्रामीण भागात मंजूर घरकुल : ३९,१४४
  • शहरी भागात मंजूर घरकुल : २२८४
  • एकूण : ४१,४२८

Web Title: 42 thousand beneficiaries in Kolhapur district will get free sand up to 5 brass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.