Local Body Election: नगरपालिकांच्या आखाड्यात... कोल्हापूर जिल्ह्यात ३८४ महिला रिंगणात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:38 IST2025-11-28T19:02:16+5:302025-11-28T19:38:53+5:30
नगराध्यक्षपदासाठी २८ महिलांमध्ये चुरस : खुल्या प्रवर्गातूनही उमेदवारी

Local Body Election: नगरपालिकांच्या आखाड्यात... कोल्हापूर जिल्ह्यात ३८४ महिला रिंगणात
कोल्हापूर : जिल्ह्यातील १० नगरपालिका, ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीत १३४ जागांसाठी ३८४ महिला उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तर नगराध्यक्षपदासाठी २८ महिला निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी महिला आरक्षित नगराध्यक्षपद वगळता फक्त आजरा आणि वडगाव या दोन ठिकाणी महिला खुल्या गटातून आपली राजकीय ताकद आजमावत आहेत.
जिल्ह्यातील १० नगरपालिका व ३ नगरपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. त्यासाठी मंगळवारी (दि. २) मतदान होत आहे. बुधवारी अपक्षांना निवडणूक चिन्ह मिळाल्यानंतर आता या राजकीय आखाड्यातील रंगत वाढली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्के जागा महिला आरक्षित आहेत. नगराध्यक्षपदासाठी ६ नगरपालिकांमध्ये महिला आरक्षण आहे.
नगराध्यक्षपद आणि सदस्यपद अशा दोन्ही गटांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या सर्व गटांमध्ये मिळून १३४ जागांवर महिलाराज असणार आहे. त्यासाठी ३८४ महिला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, त्यांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर एकूण २६३ जागांसाठी महिला व पुरुष मिळून ८४० जण निवडणुकीत आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. त्यात ४५६ पुरुष उमेदवार आहेत.
- नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये एकूण जागा : २६३
- महिला आरक्षित जागा : १३४
- नगराध्यक्षपदासाठी महिला आरक्षण : ६
आरक्षणाच्या ठिकाणीच उमेदवारी
आजवरच्या अनुभवानुसार ज्या ठिकाणी नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे त्याच ठिकाणी महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अन्यथा हुपरी, जयसिंगपूर, हातकणंगले, चंदगड, गडहिंग्लज या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकही महिला उमेदवार रिंगणात नाही. आजरा आणि वडगाव येथे नगराध्यक्षपद खुले असल्याने येथे मात्र अनुक्रमे ६ आणि २ महिला निवडणूक लढवत आहेत.
नगरपालिका : एकूण उमेदवार : महिला उमेदवार : नगराध्यक्षपदासाठी महिला उमेदवार
हुपरी : ९२ : ५० : ०
मलकापूर : ८६ : ३२ : ३
जयसिंगपूर : ८३ : ३७ : ०
हातकणंगले : ७८ : १४ : ०
शिरोळ : ७१ : ३६ : ४ (अनुसूचित जाती महिला)
कुरुंदवाड : ६५ : ३१ : ४
कागल : ६३ : २८ : ५
आजरा : ५७ : ३२ : ६
चंदगड : ५७ : २६ : ०
गडहिंग्लज : ५१ : २६ : ०
वडगाव : ४८ : २५ : २
पन्हाळा : ४४ : २२ : २
मुरगूड : ४५ : २५ : २
एकूण : ८४० : ३८४ : २८