Kolhapur: आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात नेपाळचे ३३ कामगार जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 18:08 IST2025-12-06T18:07:00+5:302025-12-06T18:08:03+5:30
सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही, वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्परता

Kolhapur: आंबा घाटात खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात नेपाळचे ३३ कामगार जखमी
आंबा/साखरपा : नेपाळी येथून कामगारांना घेऊन येणाऱ्या खासगी प्रवासी बस ५० फूट खाेल दरीत काेसळून झालेल्या अपघातात ३३ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही. हा अपघात शुक्रवारी पहाटे ४:३० वाजण्याच्या दरम्यान संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - नागपूर महामार्गावरील आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ झाला.
नेपाळ येथील पलिया येथून साेमवारी (दि.१ डिसेंबर) येथून ११० महिला व पुरुष कामगारांना घेऊन खासगी प्रवासी बस (एमपी १३, पी १३७१) रत्नागिरीकडे जात हाेती. शुक्रवारी पहाटे ही बस आंबा घाटातील चक्रीवळणाजवळ आली असता चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस दरीत कोसळली.
चालक वीरेंद्र सिंह तोमर (वय ४८, रा. मध्यप्रदेश), डेलियन चौधरी (२८), जीवन परिहार (२०), नारायण गिरी (४६), कृष्णा गिरी (६०), मुलायम सिंग (३३), तैनात खात्री (३६), तेजबहाद्दूर ठाकूर (५२), वीरबहाद्दूर मगर (४६), सुनील चौधरी (३१), शेरबहाद्दूर सारथी (५०), निरंजन थापा (२४), दमन ठाकूर (३९), वीरसिंग धामी (५०), देबा बी के (६०), कळसू चौधरी (५५), गीता मगर (५०), चंपा थापा (४७), सहनील (दीड वर्ष), जसबीर थापा (४७), इकमन खुशीराम थापा (३९) या जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच देवमा धामी (४८), नेपाली (२२), तोयनाथ खामे (४५), ग्यानबार मगर (५२), बीर बहादूर मगर (६७), शेर सारथी (५०), बांडू ठारू (७०), तेज ठाकूर (५२), भागीराम चौधरी (३६), किशोर ठारू (३५), राम बहादूर (७५), ईश्वर चौधरी (४०) यांच्यावर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लांजाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कदम, देवरुखचे पोलिस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलिस दूरक्षेत्राचे सहायक पोलिस फौजदार शांताराम पंदेरे, हेड कॉन्स्टेबल संजय करंडे, कॉन्स्टेबल अमोल दळवी, नितीन पवार, स्वप्निल कांबळे, महिला हेडकॉन्स्टेबल मनस्वी पावसकर, कॉन्स्टेबल रेणुका कांबळे, रेश्मा चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना मदत करून सुखरूप बाहेर काढले. त्याचबराेबर वाहतूक सुरळीत करण्यास सहकार्य केले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांची तत्परता
साखरपा, देवरुख, आंबा, मलकापूर येथील नरेंद्र महाराज संस्थांनच्या रुग्णवाहिकेतून सर्वांना साखरपा येथील प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक मेनकर, डॉ. सृष्टी डोर्ले, १०८ च्या डॉ. रुपाली माने, कर्मचारी भारती गुरव, सुप्रिया गावडे, निवास मुंडे, प्रसाद पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमींवर तातडीने उपचार केले. तसेच चालक महेश रेडीज, मंदार शिंदे, शिपाई विष्णू खामकर, विकास कदम यांनी उपचारासाठी मदत केली.
क्षमता ४०, प्रवासी ११२
बसची क्षमता ४० असताना गाडीत तिप्पट प्रवासी बसवले कसे याचा तपास पोलिस करीत आहेत. साताऱ्याजवळ बस बंद पडल्याने त्यातील सर्व प्रवासी याच बसमध्ये बसविले असल्याचे सांगितले जात आहे.
चालक गाडीतून बाहेर फेकला
बहुतेक जखमींना डोक्याला व हाताला मुका मार बसला आहे. चालक वीरेंद्र तोमर व दमन ठाकूर यांच्या डोक्याला व कमरेला मार बसला आहे. तोमर गाडीतून बाहेर फेकला होता. ठेकेदार राजगिरी याच्या कमरेला गंभीर दुखापत झाली आहे.